21 September 2020

News Flash

सामुदायिक श्रम व शिस्तीतूनच देश महासत्ता-हजारे

जनतेने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशात मोठे राजकीय परिवर्तन घडवले, परंतु कोणी एक व्यक्ती, पक्ष किंवा आघाडी देशाचे प्रश्न सोडवेल, असे मानून निष्क्रिय राहणे जनतेला परवडणारे

| June 16, 2014 03:15 am

जनतेने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशात मोठे राजकीय परिवर्तन घडवले, परंतु कोणी एक व्यक्ती, पक्ष किंवा आघाडी देशाचे प्रश्न सोडवेल, असे मानून निष्क्रिय राहणे जनतेला परवडणारे नाही, सामुदायिक श्रम व शिस्तीचा अवलंब करूनच देश महासत्ता बनेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
हजारे यांचा वाढदिवस स्नेहालय संस्थेच्या हिंमतग्राम प्रकल्पात साजरा करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, स्नेहालयच्या सुमन त्रिभुवन, बाबूशेठ भंडारी, संस्था पालक मिलिंद कुलकर्णी, संतोष होनकरपे (पुणे) आदी उपस्थित होते.
या वेळी १ हजार वृक्षांचे रोपण, रक्तदान शिबिरात २०० जणांचे रक्तदान, ग्रामसफाई आदी उपक्रम राबवण्यात आले. भ्रष्टाचारविरोधी लढय़ातील कार्यकर्ते नरेंद्र अण्णा पाटील (जळगाव) व अविनाश जुनघरे (अमरावती) यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणारे ऋषीकेश पत्की, डॉ. संदीप साठे, डॉ, गणेश पोटे, रोहित जोशी, योगेश पांडे तसेच प्रतिकूल परिस्थितीत बारावी उत्तीर्ण झालेले स्नेहालय व बालभवन प्रकल्पातील यशवंत विद्यार्थ्यांचा, हिंमतग्राम प्रकल्पासाठी जमिनीची देणगी देणारे हेमचंद तथा बाबूशेठ भंडारी व चंपालाल चोपडा यांचा सत्कार करण्यात आला. हिंमतग्राम प्रकल्पाची दशकपूर्तीही या वेळी साजरी करण्यात आली. हजारे यांच्या आवाहनानुसार कार्यक्रमात कोणतेही हारतुरे न स्वीकारता उपस्थित गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या श्रमसंस्कार शिबिरात ५५ युवकयुवतींनी सहभाग घेतला.
या वेळी आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत नवनिर्माणाच्या नव्या प्रेरणा’ या विषयावर बोलताना हजारे म्हणाले, देशातील युवकांना भ्रष्टाचार, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, राजकीय अराजकता याविरुद्ध संघटित करण्यात सामाजिक माध्यमांनी महत्त्वाची भुमिका बजावली. देशातील राज्यकर्त्यांकडून युवकांना खूप अपेक्षा आहेत, त्यांची अपेक्षापूर्ती झाली नाही तर संघटित युवाशक्ती कोणालाच माफ करणार नाही, तथापि कोणी मसिहा येऊन आपले प्रश्न सोडवेल, असे मानणे आत्मघात ठरेल. जनमताचा संघटित व सक्रिय दबाव राहिला तरच कोणतीही राजकीय व्यवस्था आणि राज्यकर्तेही जबाबदारीने काम करतात.
या वेळी पुणे येथील रोटरी क्लबने एचआयव्ही रुग्णांसाठी ३ लाख २१ हजार रुपये किमतीची रुग्णवाहिका स्नेहालय संस्थेला भेट देण्यात आली. हिंमतग्राममधील लाभार्थीच्या हस्ते हजारे यांचा सत्कार करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 3:15 am

Web Title: country become a super power followed by collective labor and discipline
Next Stories
1 चव्हाणांचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडून मोडीत
2 सव्वाचार लाख रुपयांचा गुटखा साता-यात जप्त
3 ऐषारामी जीवन जगणा-या चोरटय़ाला अटक
Just Now!
X