भाजपाने देश हुकुमशाहीकडे न्यायला सुरुवात केली असून मागच्या दाराने आणीबाणी आणली आहे. असहिष्णूतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत, असे स्पष्ट मत विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भिवंडी येथील जाहीर सभेत केले.

वाढत्या महागाईमुळे जगणे मुश्किल झाले आहे. ग्राहक आणि शेतकरी समाधानी नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आम्ही अडचणी येवू दिल्या नाहीत. त्यांना कर्जमाफी दिली, अडचणीला धावून गेलो. परंतु, हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे असा आरोपही पवार यांनी केला.

बेस्टचा संप का मिटवत नाही, मुंबईकरांचे हाल का करताय? नेतृत्वात ताकद असली पाहिजे, निर्णय घेण्याची धमक असली पाहिजे. अहो एक दिवस समजू शकतो. सात दिवस झाले संपाला, परंतु अजून निर्णय नाही हे काय चालले आहे असा सवाल त्यांनी केला.

बुलेट ट्रेन आणून हे सरकार मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम करत आहे असा आरोप करतानाच या बुलेट ट्रेनची काय आवश्यकता अशी विचारणा ही सरकारला त्यांनी केली.

बेरोजगारांना नोकर्‍या नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफीला द्यायला पैसे नाहीत. परंतु, बुलेट ट्रेनला द्यायला यांच्याकडे पैसे आहेत. आधी इथल्या समस्या सोडवा. नको ती सोंगं करु नका, अशा शब्दात पवार यांनी सरकारचा समाचार घेतला. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला मोदींना हटवा. सेना भाजपाचे सरकार घालवा, असे आवाहन करतानाच त्यांनी जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.