कापसाच्या दरात वाढ झाल्याने समस्या

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या तुलनेत देशांतर्गत कापसाच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा देशातील वस्त्रोद्योग निर्यात ठप्प झाली असून यामुळे वस्त्रोद्योगासमोर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. वस्त्रोद्योगातील सूत, कापड व गारमेंट निर्यातच ठप्प झाल्याने रोजगाराचा प्रश्नही जटिल झाला असून याबाबत धोरणात्मक निर्णय तत्काळ घेण्याची गरज असल्याचे मत विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी व्यक्त केले आहे.

केंद्र शासनाने गेल्या वर्षी कापसाच्या हमी भावामध्ये दीडपट वाढ केल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आपले कापसाचे दर  ४५ हजार ते ४८ हजार प्रती खंडीच्या  (३५६ किलो) खाली येऊ शकले नाहीत, तर दुसऱ्या बाजूला अमेरिका व इतर देशातील कापूस आपल्यापेक्षा उच्च प्रतीचा असून हा कापूस भारतीय चलनात ३४ ते ३६ हजार प्रती खंडीने विकला जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापूस प्रतवारीनुसार आज सुमारे तब्बल २० ते २५ टक्के महाग आहे.

स्पर्धेच्या युगात ही महागाईची  गोष्ट खूप मोठी असून , त्यामुळे देशातील वस्त्रोद्योगाचा खर्च वाढला आहे. यामुळे भारतातून होणारी ,सूत व कपडय़ांची निर्यात पूर्णपणाने ठप्प झाली आहे. परिणामी देशातील सूत गिरण्या व विकेंद्रित यंत्रमाग उद्योगातील उत्पादनाच्या अतिरिक्त पुरवठय़ामुळे या दोन्ही उत्पादनांचे  साठे वाढले असून देशांतर्गत विक्रीचे दर कोसळले आहेत.या अनिश्चित व नकारात्मक वातावरणामुळे या उत्पादक साखळीतील जीिनग ,स्पििनग,वििव्हग, गारमेंटींग ,प्रोसेसिंग हे सर्वच विभाग प्रचंड आर्थिक नुकसानीमुळे अंशत बंद पडले आहेत, तर बाकीचे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

केंद्र शासनाने ही तफावत व निर्यातीमधील अडसर  दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना कापूस अनुदान देऊन सूत गिरण्यांना आंतरराष्ट्रीय कापसाच्या दराच्या तुलनेत कापूस उपलब्ध करुन देणे व करचुकवेगिरी करुन होणारी आयात रोखणे आवश्यक आहे. अन्यथा, आज अंशत बंद पडलेली ही वस्त्रोद्योग साखळी येणाऱ्या काही महिन्यात पूर्णपणे बंद पडलेली पाहावी लागेल,असे  तारळेकर यांनी सांगितले.

बांगलादेशाशी केलेल्या करारामुळे फटका

चीन व अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा देखील खूप मोठा फटका भारतीय निर्यातीला बसत आहे. तर तिसऱ्या बाजूला भारताने बांगला देशाशी केलेला मुक्त व्यापार करार भारतीय वस्त्रोद्योगाच्या मुळावर आला आहे. या करारान्वये बांगला देशातून भारताकडे होणाऱ्या आयातीवर आयात कर लावला जात नाही किंवा वाढविता येत नाही. याचा फायदा बांगलादेशीय वस्त्रोद्योगास होत असताना याचा गैरफायदा चीनसारख्या देशांनी घेतला असून बांगला देशाच्या नावाने चीनमधून कराची चोरी करुन भारतात प्रचंड मोठय़ा प्रमाणावर कापड व रेडीमेड गारमेंट पाठविले जात असल्याने आपल्या उत्पादकांची उत्पादने गिऱ्हाईकाअभावी पडून आहेत.