कासा : विक्रमगड तालुक्यातील कर्हेतलावली येथे विहिरीत पडलेल्या आठ वर्षीय चिमुरडीचे आठवीत शिकरणाऱ्या १४ वर्षीय संजना जेठू राव या मुलीने प्राण वाचवले. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता ती विहिरीत उतरली आणि तिने या चिमुरडीला बाहेर काढले.

कर्हेतलावली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीत शिकणारी संजना पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. पाणी भरल्यानंतर ती घराच्या दिशेने निघाली. त्याच वेळी तिच्या गावातीलच तिसरीमध्ये शिकणारी जागृती विष्णू राव ही आठ वर्षीय मुलगी पाणी भरत होती. संजना पाणी भरून पुढे निघाली असतानाच जागृतीचा पाय घसरून पाण्यात पडल्याचे तिच्या लक्षात आले.

संजना परत विहिरीजवळ आली आणि तिने मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र आजूबाजूला कुणी नसल्याने मदतीसाठी कोणी येत नव्हते. विहिरीमध्ये जागृतीही घाबरलेल्या अवस्थेत होती. तिचे हात-पाय थरथरत होते. मात्र अशा वेळी संजना तिला धीर देत होती. तिला पाण्यात हातपाय हलवत ठेवण्याच्या सूचना देत होती. मदतीसाठी कोणी येत नाही हे लक्षात येताच आता आपणच काहीतरी करायला हवे, असे तिला वाटू लागले. मनातली भीती दूर करत स्वत:ला धीट बनवत तिने स्वत: विहिरीत उरण्याच्या निर्णय घेतला.

विहिरीला पायऱ्या नव्हत्या. मात्र विहिरीत चढण्या-उतरण्यासाठी काही दगड सोडलेले होते. ती कठडय़ावर चढली. त्याच दगडांच्या मदतीने एकेक दगड उतरत ती विहिरीतल्या पाण्यापर्यंत पोहोचली. जागृतीनेही कमालीचे धर्य दाखवले होते. तीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत सतस दगडाकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. अखेर संजना उभी असलेल्या दगडापर्यंत ती पोहोचली.

मात्र जागृतीला वर घेऊन येणे हे कठीण काम होते. कारण दोन दगडांमध्ये अंतर खूप होते. संजनाने जागृतीला खांद्यावर घेतले आणि एकेक दगड चढत ती विहिरीच्या कठडय़ावरती आली. जागृती खूप घाबरली होती. तिला संजनाने तत्काळ दवाखान्यात नेत तिची वैद्यकीय तपासणी करून घरी सोडले.

१४ वर्षीय संजनाने प्रसंगावधात दाखवत आलेल्या परिस्थितीचा धैर्याने सामना करत जागृतीचा जीव वाचविला. तिच्या या धैर्याचे सर्वत्र खूप कौतुक होत असून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनीही तिची भेट घेऊन तिचा सत्कार केला.

मी पाणी भरून घरी चालली होती. त्यावेळी जागृती विहिरीत पडल्याचे समजले. पहिल्यांदा मी खूप घाबरली होती. मदतीसाठी आरडा-ओरडा केला. मात्र कोणाला आवाज न गेल्यामुळे कोणी मदतीसाठी येत नव्हते. हिंमत करून मी विहिरीत उतरले आणि वर आले. तिला दवाखान्यात नेले आणि तिच्या बोटावर झालेल्या जखमेवर मलमपट्टी केली.

– संजना राव