21 September 2020

News Flash

सात वर्षे बेपत्ता पतीपासून घटस्फोटाचा अर्ज मंजूर

पत्नीने आपला पती बेपत्ता असल्याची नोटीस वृत्तपत्रांतून प्रसिद्धीला दिली होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

बार्शी वरिष्ठ न्यायालयाचा निकाल

सोलापूर : पती सात वर्षांपेक्षा अधिक काळ बेपत्ता असल्यामुळे आणि तो हयात असल्याचा कोणताही पुरावा आढळून येत नसल्यामुळे पत्नीने घटस्फोट घेण्यासाठी केलेला अर्ज बार्शीच्या वरिष्ठ स्तर न्यायालयाने मंजूर केला.

या प्रकरणाची पाश्र्वभूमी अशी,की बार्शी तालुक्यात राहणाऱ्या एका शिक्षिकेचा विवाह ९ फेब्रुवारी १९९२ रोजी झाला होता. तिला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.  या महिलेचा पती १७ सप्टेंबर २००३ रोजी अचानकपणे घरातून निघून गेला. सर्वत्र शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. पत्नीने पांगरी पोलीस ठाण्यात आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. परंतु पोलिसांनी तपास करूनही ठावठिकाणा लागला नाही. पत्नीने आपला पती बेपत्ता असल्याची नोटीस वृत्तपत्रांतून प्रसिद्धीला दिली होती. तरीही त्याचा शोध लागला नाही.

सात वर्षे बेपत्ता झालेला पती जिवंत आहे अथवा नाही याबाबत कोणतीही माहिती नसल्यामुळे पत्नीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. हिंदू संस्कृतीप्रमाणे या पीडित शिक्षिकेला विधवा म्हणूनही वागता येत नव्हते. परित्यक्ता महिला म्हणूनही समाजाकडून मान्यता मिळत नव्हती. विधवा किंवा परित्यक्ता महिला म्हणून नोकरीसाठीचे सोयीचे ठिकाण आणि इतर अनुषंगिक लाभही मिळत नव्हते.

शेवटी या पीडित शिक्षिकेने अ‍ॅड. प्रशांत शेटे यांच्या मार्फत बार्शीच्या वरिष्ठ स्तर न्यायालयात धाव घेऊन सात वर्षोपेक्षा अधिक कालावधीपासून बेपत्ता असलेल्या पतीपासून विवाह विच्छेदन होऊन मिळण्यासाठी हिंदू विवाह कायद्यातील तरतुदीनुसार घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. वरिष्ठ स्तर न्यायाधीश तेजवंतसिंह संधू यांच्यासमोर या अर्जाची सुनावणी झाली. कायद्यातील तरतुदी आणि या प्रकरणातील वस्तुस्थिती पाहून न्यायालयाने पीडित शिक्षिकेचा घटस्फोट अर्ज मंजूर केला. हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींनुसार अशा प्रकारे विवाह विच्छेदन मंजूर होण्याची सोलापूर जिल्ह्य़ातील अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना असल्याचे मानले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 3:10 am

Web Title: court accepts divorce appeal against husband who missing for seven years zws 70
Next Stories
1 राजकारण अस्पृश्य मानणाऱ्या वैद्यकीय जागृती मंचचे अध्यक्ष भाजपच्या मांडवात
2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची किरकोळ कारणावरूनआत्महत्या
3 दुष्काळी सोलापुरात तासाभरात दमदार ५८ मिमी पाऊस
Just Now!
X