दिवाणी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या छताचा मलबा पडला. या वेळी छताखाली असलेले वकील सुदैवानेच बचावले. मात्र, या प्रकारामुळे वकील संघाने तीव्र संताप व्यक्त करीत इमारत बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका वकील संघाने सोमवारी दिवसभर न्यायालयीन कामकाज बंद ठेवले.
औंढा नागनाथ दिवाणी न्यायालयाच्या (कनिष्ठस्तर) नूतन इमारतीचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र, शनिवारी (दि. ३०) इमारतीत छताखाली अॅड. मगर, अॅड. बी. के. सानप, बी. डी. कुटे, विजय नागरे, अॅड. श्रीमती एस. पी. जोशी, अॅड. दीपाली काळे आदी न्यायालयीन कामकाजानिमित्त इमारतीत उपस्थित होते. याच वेळी इमारतीच्या छताचा मलबा खाली पडला. सुदैवाने वकील मंडळींना दुखापत झाली नाही. या प्रकारामुळे तालुका वकील संघाने संताप व्यक्त केला.
वकील संघाचे अध्यक्ष अॅड. बालाजी सानप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बठकीत अॅड. आय. जे. शेख व अॅड. बी. डी. कुटे यांनी या इमारत बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रस्तावाला वकील संघाच्या सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. त्यानंतर वकील संघाने सोमवारी दिवसभर न्यायालयीन कामकाज बंद ठेवून औंढा नागनाथ तहसील कार्यालयात निवेदन दिले. इमारतीचे बांधकाम निकृष्ट झाले असून या कामाची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करून संबंधित कंत्राटदार, अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली. निवेदनावर अॅड. मुंजाजी मगर, विजय नागरे, शंकर देशपांडे, दीपाली काळे, प्रदीप पोले आदींच्या सह्य़ा आहेत.