पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याची बाब गंभीर असून ती स्वच्छ करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केली. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (नीरी) नदीची तातडीने पाहणी करून तिला पूर्ववत करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या शिफारसी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय माने आणि इचलकरंजी येथील चौघांनी पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयासमोर आणला असून न्यायमूर्ती एस. जे. वझिफदार आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.
नदीची पाहणी करून, तिची सध्याची अवस्था काय आहे, ती प्रदूषित होण्यासाठी कारणीभूत बाबी काय आहेत, तिला पूर्ववत करण्यासाठी नेमकी काय पावले उचलली गेली पाहिजेत याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने ‘नीरी’ला दिले. तसेच ‘नीरी’ला या कामासाठी सर्व माहिती कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही पालिकांनी द्यावी, असेही स्पष्ट केले.