वयोवृद्ध आईचा शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर काढणाऱ्या उद्योजक मुलगा व सुनेला न्यायालयाने दणका दिला आहे. दैनंदिन गरजांसाठी पोटगीस्वरूपात आईला दरमहा १० हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुलाने व सुनेने स्वतः किंवा इतरांकडून आईला त्रास न देण्याच्या सूचना केल्या आहेत.

पुण्यातील एका वृद्ध महिलेला दोन विवाहित मुले आणि एक विवाहित मुलगी आहे. वृद्ध महिलेने स्वकष्टातून एक सदनिका खरेदी केली होती. पतीच्या निधनानंतर लहान मुलगा, पत्नी आणि नातवंडे जबरदस्तीने तिथेच राहत होती. तरीही सुनेकडून जेवायला न देणे, जाणूनबुजून सिलिंडरचे बटण सुरू ठेवून जिवे मारण्याचा प्रयत्न करुन सदनिका बळकावण्यासाठी त्रास देणे सुरू होते.

मुलाच्या आणि सुनेच्या त्रासाला कंटाळून वृद्ध आईने पोलिस ठाण्यातही तक्रार दिली होती. परंतु, पोलिसांकडून योग्य मदत न मिळाल्याने शेवटी या त्रासाला कंटाळून वृद्ध आईने न्यायालयात दैनंदिन गरजांसाठी पोटगीची मागणी केली होती.

वृद्ध महिलेचे वकील अॅड. योगेश पवार यांनी केलेल्या युक्तिवादानंतर वृद्ध आईला मुलाने १० हजार रुपये पोटगी द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुलाला आणि सुनेला वृद्ध आईच्या सदनिकेत जाण्यापासून मज्जाव केला आहे.