काँग्रेस पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना करण्यात आलेल्या मारहाणप्रकरणी न्यायालयाने मंगळवारी चार आरोपींना ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज या आरोपींना सुनावणीसाठी खेड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने हा निकाल दिला. याशिवाय, न्यायालयाकडून मारहाण प्रकरणातील आरोपी निलेश राणे यांना देश सोडून जाण्यास मनाई केली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे. निलेश राणे यांच्या नावावर गुन्हा दाखल होऊनदेखील त्यांना अटक न करण्यात आल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. ठाण्याच्या पोलिसांनी अपहरणासारखा अजामीनपात्र गंभीर गुन्हा नोंदवल्याने नीलेश यांची अटक अटळ मानली जात होती. पण कनिष्ठ चिरंजीव नीतेश यांना गेल्या महिन्यात सिंधुदुर्गातील डंपर आंदोलनप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली होती, हे लक्षात घेऊन आज नीलेश यांच्या वतीने तातडीने कायदेशीर हालचाली करून येथील न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्यात आला होता.
संदीप सावंत मारहाण प्रकरण पेल्यातील वादळ ठरणार? 
राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला गेल्या २४ एप्रिल रोजी रात्री चिपळूण येथील घरातून जबरदस्तीने उचलून गाडीत कोंबले आणि मारहाण करत मुंबईला नेले, अशा आशयाची तक्रार सावंत यांनी पोलिसांकडे नोंदवली होती. यानंतर नीलेश यांच्यासह पाच जणांविरुद्घ अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, सावंत यांना मारहाण झाल्याची तक्रार हे सेनानेत्यांचे षड्यंत्र असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता.