वसई-विरार शहरातील गटारांवर चक्क मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेची नावे असलेली झाकणे बसवण्यात आली आहेत. ही झाकणे मुंबईतून चोरून वसईतील गटारात बसवण्यात आली आहे, अशी उपरोधिक तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

वसई-विरार शहरातील अनेक गटारे उघडी असल्याने नागरिकांसाठी धोकादायक ठरत होती. महापालिकेने अखेर ही सर्व गटारे झाकणे लावून बंदिस्त केली. मात्र लावण्यात आलेल्या झाकणांवर बीएमसी (मुंबई महापालिका) आणि एनएमएमसी (नवी मुंबई महापालिका) अशी आद्याक्षरे आहेत. वसईत नवी मुंबई आणि मुंबईची नावे असलेली झाकणे कशी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गटारांची कामे करणाऱ्या ठेकेदाराने दुसऱ्या शहरातील झाकणे वसईतील गटारांवर कशी बसवली, असा सवाल करून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केला आहे. ठेकेदाराने ही झाकणे मुंबई आणि नवी मुंबईची वापरली आहेत. तेथून ही झाकणे चोरीला गेली असून ती वसईतील गटारावर बसवण्यात आली आहे, अशा आशयाची उपरोधिक तक्रार भट यांनी मुंबई पालिका आयुक्तांकडे केली आहे.

ठेकेदाराला जेव्हा काम दिले जाते, तेव्हा तो येणाऱ्या खर्चासह निविदा सादर करतो आणि मगच काम मंजूर होते. ठेकेदाराने इतर शहरातील झाकणे वसईत लावली याचा अर्थ त्याने मंजूर कामातील खर्चात कपात केली तसेच कामही निकृष्ट केले, असा आरोप चरण भट यांनी केला आहे. पालिका अभियंत्यांनी ठेकेदाराची बिले मंजूर करताना तपासणी करायची असते तीही केली नाही, असेही ते म्हणाले.

वसई-विरार महापालिकेसाठी काम करणारा ठेकेदार इतर शहरांतीलही गटारांची कामे करतो. त्यामुळे त्याने मुंबई आणि नवी मुंबई शहरांतील गटारांवरील झाकणे वसईत बसवली. गटारांचे काम योग्यरीतीने झाले आहे. झाकणे कुठल्या शहरांच्या नावाची बसवली यापेक्षी ती व्यवस्थित बसवली आहेत, हे महत्त्वाचे आहे.

-राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, महापालिका.