राज्यात आज दिवसभरात करोनातून बरे झालेल्यांपेक्षा जवळपास दुप्पट संख्येने नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात ४ हजार १३० नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २ हजार ५०६ जण करोनामुक्त झाले आहेत. शिवाय, ६४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झालेली आहे. त्यामुळे राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आहे, असं जरी बोललं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र अद्यापही दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडणे सुरूच आहे. राज्यात दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांची संख्या ही दिवसभरात करोनामधून बरे झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. शिवाय, राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आलेले असले, तरी देखील करोनाबाधितांची संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आल्यास, पुन्हा एकदा लॉकडाउनचा इशारा देखील दिला गेला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८८,८५१ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घर परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०२ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,८२,११७ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७७०७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४६,६०,८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८२,११७ (११.८६ टक्के) नमुने पॉझटिव्हि आले आहेत. सध्या राज्यात ३,०२,१९६ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर, २ हजार ०१३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५२,०२५ अॅक्टिव्ह आहेत.