राज्यातील ११ जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून करोनाचे निर्बंध राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आलेले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यांना ही सूट देण्यात आलेली आहे. तर, अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, तिथे निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही राज्यात दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तसेच, रूग्ण करोनातून बरे देखील होत आहेत. राज्यात रोज आढळून येणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ७ हजार ४३६ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ६ हजार १२६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, १९५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,१७,५६० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.६९ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,२७,१९४  झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३३४१० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८७,४४,२०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,२७,१९४ (१२.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,४७,६८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७२,८१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.