राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. शिवाय दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत मागील बऱ्याच दिवसांपासून करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दिवसभरात राज्यात ९ हजार ४३ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ८ हजार ४७० नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, आज राज्यात १८८ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५७,४२,२५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९ टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९८,८६,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,८७,५२१ (१५.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५८,८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२३,३४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात आज एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच त्यांचे अभिनंदन केले आहे.