राज्यात करोनाचं संकट असून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौरा करत स्थितीचा आढावा घेत आहेत. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली असून राज्यभरात वणवण फिरण्यापेक्षा नागपुरात बसावं असा टोला लगावला आहे. कोला येथील शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी नागपुरात राहूनच काम करण्याचा सल्लाही दिला. दरम्यान त्यांच्या या सल्ल्यावर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडवणीस कोपरगाव येथील आत्मा मालिक ज्ञानपीठच्या संजीवनी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे. मी आधीच हे सुरु केलं आहे हे त्यांना माहिती नसावं. नागपूरमध्ये जे काही काम करायचं आहे ते केलं आहे. नागपुरला ऑक्सिजनची गरज होती, तोदेखील आणला आहे. वेगवेगळ्या रुग्णवाहिका तसंच सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना माहिती नसावं, त्यामुळे ही माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू”.

प्रकाश आंबडेकर यांनी काय म्हटलं होतं –
“फडणवीसांनी राज्यभरात वणवण फिरण्यापेक्षा आणि करोना मुद्द्यावर इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा नागपुरातच बसावं. फडणवीस यांनी नागपुरातच राहून चार-पाच कोविड सेंटर उभारावेत,” असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांना दिला होता.