हिंगोली : हिंगोली जिल्ह्य़ातील रुग्णसंख्येत गेल्या आठ दिवसांपासून घट झाल्याचे सकारात्मक चित्र समोर येत असले, तरी मृत्यूचे प्रमाण कायम असून सरासरी दररोज पाच जण करोनामुळे दगावत आहेत. १ ते ८ मे या आठ दिवसांत ४३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यू पावलेल्या रुग्णांचा आकडा २७५ वर पोहोचलेला आहे. करोनाचा मृत्युदर चिंता वाढवणारा आहे.

८ मे रोजी १६५ करोनाचे नवे रुग्ण आले; तर पाच बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून करोनाची रुग्णसंख्या घटत आहे. त्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात करोनाच्या चाचण्याही बऱ्याच प्रमाणात घटल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात सध्या विविध आजारांनी डोके वर काढले आहे. यात अनेकांना करोनाची बाधा झाल्याचेही नाकारता येत नाही. मात्र ही तपासणी करून घेण्यात ग्रामीण जनता उदासीन आहे. त्यात अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने ते बरे होत असले तरीही कुटुंबातील वृद्धांना मात्र याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून झालेल्या मृत्यूंमध्ये ग्रामीण वृद्धांचीच संख्या मोठी आहे.

प्राणवायू खाटांची कमतरता नसून साधे बेडही मोठय़ा प्रमाणात शिल्लक आहेत. मागील काही दिवसांत टाळेबंदीमुळे रुग्णांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले. हा प्रकार दखलपात्र असला, तरीही ग्रामीण भागातील तपासणीकडे होणारे दुर्लक्षही गंभीर बाब आहे.

पहिल्या टप्प्यात प्रशासकीय यंत्रणेच्या यशस्वी कामगिरीमुळे ३१ डिसेंबर २०२० रोजी एकूण ३ हजार ५१६ रुग्ण आले होते. त्यापैकी ३ हजार ४१३ रुग्ण बरे झाले होते. तर सक्रिय रुग्णांची संख्या ५० होती व मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ५३ होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात ९ एप्रिल २०२१ मध्ये सक्रिय रुग्णांनी एक हजारी ओलांडली. तर २४ एप्रिलला ही संख्या दीड हजारावर पोहोचली. तर मृतांची संख्या १८६ वर पोहोचली होती. ती आता २७५ वर गेली आहे. आतापर्यंत १४,०६२ रुग्णांपैकी १२,८७७ रुग्ण बरे झाले आहेत.

प्राणवायू खाटा मुबलक, रेमडेसिविरचा पुरवठा

हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात प्राणवायूवरील ११० तर विना प्राणवायूचे २० रुग्ण आहेत. तर ८ प्राणवायू खाटा शिल्लक आहेत. बसस्थानकासमोरील नवीन रुग्णालयात प्राणवायूवरील ५५ तर विना प्राणवायूचे २५ रुग्ण दाखल आहेत. या ठिकाणी १० प्राणवायू खाटा शिल्लक आहेत. कळमनुरीत विना प्राणवायूचे ४८ तर प्राणवायूवरील ६६ रुग्ण दाखल आहेत. येथे ३४ प्राणवायू खाटा रिकाम्या आहेत. वसमतमध्ये विना प्राणवायूचे ९ तर  प्राणवायूवरील ४६ रुग्ण आहेत. येथे ४ खाटा रिकाम्या आहेत. सिद्धेश्वरला विना प्राणवायू १२ तर प्राणवायू खाटा २६ आहेत. तर २ खाटा रिकाम्या आहेत. कौठा येथे पूर्ण ३५ खाटा भरलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आता प्राणवायू खाटा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत असल्याचे दिसून येत आहे.