मुंबईपाठोपाठ राज्यातील रुग्णसंख्येचा आलेख महिनाभराच्या लॉकडानंतरही खाली घसरताना दिसत आहे. राज्यात सोमवारी आढळून आलेल्या रुग्णंसख्येपेक्षा करोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होती. त्यामुळे दिलासादायक चित्र आहे. मात्र, करोनाच्या यश-अपयशावरून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाकरे सरकारला सवाल केला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारने लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाउनचे परिणाम आता दिसून येत असून, रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईतील परिस्थितीही नियंत्रणात आलेली असून, मुंबई मॉडेलचं कौतुक होत आहे. मुंबई आणि राज्यातील परिस्थितीवर समाधान व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं असून, या ट्विटमध्ये करोना परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं आहे. “आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यमं कशी घेऊ शकतात?,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

राज्यातील परिस्थिती कशी आहे?

राज्यात सोमवारी (१० मे) दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट झाली. राज्यात ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ही गेल्या काही आठवड्यांतील ही सर्वात निच्चांकी रुग्णसंख्या ठरली आहे. विशेष म्हणजे सोमवारी ६१ हजार ६०७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनाच्या २ कोटी ९६ लाख ३१ हजार १२७ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यातील ५१ लाख ३८ हजार ९७३ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.