News Flash

….आता कानाच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रूग्णसंख्या झपाट्याने वाढतेय

काळी बुरशीचा संसर्ग वाढत असतानाच आता कानाच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका (प्रातिनिधक - PTI)

संदीप आचार्य
करोना रूग्णांमध्ये म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशीचा संसर्ग वाढत असतानाच आता कानाच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढताना दिसून येत आहे. उन्हाळा व पावसाळ्यात कानात बुरशी संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते. मात्र सध्या कोरोना संसर्गाच्या भितीमुळे घराबाहेरून आल्यावर वारंवार आंघोळी करणाऱ्या लोकांमध्ये कानात ओलावा राहिल्यानं ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही अशांमध्येही कानाला बुरशीजन्य संसर्ग होत असल्याचे पहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत.

ओटिटिस म्हणजेच कानाला होणाऱ्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका सध्या वाढताना दिसून येत आहे. सर्व वयोगटातील लोकांमध्ये कानात बुरशी होण्याचा त्रास पाहायला मिळत आहे. केईएम रूग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. निलम साठे म्हणाल्या की, ‘‘मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात कानात संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या वाढली आहे. दररोज बाहयरूग्ण विभागात १५ ते २० रूग्ण उपचारासाठी येत आहेत. बऱ्याचदा करोनाच्या भितीपायी अनेक लोक वारंवार हात आणि चेहरा धुवतात. यात कानात पाणी राहिल्यास अशी स्थिती बुरशीच्या वाढीस पोषक ठरते. परिणामी काळ्या-पांढऱ्या रंगाची ही बुरशी कानात वाढते. कानात बुरशी संसर्ग होणं हे गंभीर नसले तरी रूग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे. याशिवाय कानातील बुरशीसंसर्ग टाळण्यासाठी कान स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. आंघोळीनंतर कान व्यवस्थित साफ करून कोरडे करावेत. कानातील मळ काढण्यासाठी इअरबड्सचा वापर करणे शक्यतो टाळावेत.’’

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. प्रशांत केवले म्हणाले की, ‘‘ऑटोमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार असून मुख्यतः कानाला संसर्गाचा धोका अधिक असतो. दुषित पाण्यात पोहणे, कानाला आघात होणे आणि मधुमेह या कारणांमुळे कानाला संसर्ग होऊ शकतो. मात्र अद्यापही कानदुखी सारख्या रोगांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने दुर्लक्षामुळे हा धोका अधिक वाढण्याची भीती आहे. कानात पाणी शिरणे अथवा वेळेत ते काढले न जाणे यामुळे कानात बुरशी होण्याची अनेक उदाहरणे सध्या दिसून येत आहेत.’’ बुरशीच्या वाढीमुळे कानदुखीचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत आहेत. महिन्याभरात ३०-४० रुग्ण अशाप्रकारच्या समस्या घेऊन येत आहेत. बुरशी होणे हा गंभीर रोग नसला तरी त्याकडे वेळेच लक्ष देऊन वैद्यकीय उपचार न केल्यास बुरशीची वाढ झपाट्याने होऊन समस्या अधिक गंभीर होऊ शकते असे डॉ प्रशांत म्हणाले.

जे. जे. रूग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितले की, ‘‘म्युकरमायकोसिस या आजारासह आता कानाला होणाऱ्या संसर्गाच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. लॉकडाउनमध्ये वर्क फ्रॉम होममुळे अनेकजण हेडफोनचा वापर करत आहेत, यामुळेही कानाला संसर्ग होऊ लागला आहे. दर दिवशी बाह्यरूग्ण विभागात २० रूग्ण उपचारासाठी येत आहेत. या रूग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडत आहोत. हेडफोन वापरण्याचे प्रमाण वाढल्याने कानाच्या बाहेरील भागात त्वचेचा संसर्ग होतो. कानाच्या त्वचेला रॅश येणं, त्वचेला फोड येणं, कानाला इजा होऊ कान खाजवणे, कान दुखणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. याशिवाय हेडफोन घातल्याने कानामध्ये हवा शिरत नाही. कानात ओलावा निर्माण होतो. याशिवाय कानात आंघोळीचे पाणी साचल्याने बुरशी होण्याचा धोका वाढतो.’’

झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयातील कान-नाक-घसा सर्जन डॉ. शलाका दिघे म्हणाल्या की, “वयोवृद्धांमध्ये कान दुखण्याची ही एक सामान्य समस्या आहे. कानाला बुरशी संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी कानात पाणी साचू देऊ नका, आंघोळीनंतर कान सुकवा, कानात तेल टाकणे टाळा, कानात मोठ्याने ओरडू नका आणि कान नियमितपणे स्वच्छ करा. नाकात मळ साचलेला असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार घ्या. मळ काढण्यासाठी ईअरबड्सचा वापर करणे शक्यतो टाळावेत. “

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 5:55 pm

Web Title: covid 19 doctors alert ear fungus symtoms treatment sgy 87
Next Stories
1 वेठबिगार म्हणून राबविणाऱ्या ७० हजार ‘आशां’चा बेमुदत संपाचा निर्णय!
2 …तर काय लायकी राहिली असती; निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र
3 लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या १०८ वर्षांच्या आजीचा जयंत पाटलांनी केला सत्कार
Just Now!
X