News Flash

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधान मोदींची भेट; काय होणार चर्चा?

उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधान मोदींची भेट

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून राज्यात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच ओबीसींच्या राजकीय आरक्षणालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यात भरच पडली आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून विरोधकांकडून ठाकरे सरकारची कोंडी केली जात आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच अलिकडेच येऊन गेलेल्या तौते चक्रीवादळाच्या मदतीसंदर्भातही बैठकीत चर्चा केली जाणार आहे. मंगळवारी दिल्लीत ही भेट होणार आहे.

दुसरी लाट ओळखताना उशीर झाला, पण तिसरी लाट येऊ द्यायची नाही – उद्धव ठाकरे

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि तौते चक्रीवादळ मदतीसंदर्भात चर्चा केली जाईल”.

दरम्यान महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येत गेल्या काही आठवड्यांपासून घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात जवळपास ६० लाख रुग्ण आढलले असून एप्रिलच्या अखेपर्यंत सात लाखांपर्यंत असणारी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता कमी झाली आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत १२ हजार ५५७ नव्या रुग्णांची आणि ६१८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यासोबत करोनामुळे मृत्यू झालेली संख्या एक लाखांच्या पुढे पोहोचली आहे.

महाराष्ट्रात निर्बंध शिथील
सुमारे अडीच-तीन महिन्यांनंतर सोमवारपासून मुंबई, ठाण्यासह राज्याच्या बहुतांश भागांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पंचस्तरीय विभागणीनुसार दुसऱ्या स्तरात असलेल्या ठाणे शहरातील दुकाने दिवसभर खुली राहणार असून, तिसऱ्या स्तरात असलेल्या मुंबईत दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गसाखळी तोडण्यासाठी राज्यभरात लागू असलेले संचारबंदीसह कठोर निर्बंध साप्ताहिक बाधितांचे प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे पाच स्तरांत शिथिलीकरण करण्यात आले आहेत. तसेच याबाबतचा आढावा दर आठवडय़ाला घेण्यात येईल.

निर्बंध शिथिल करताना मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई-विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे, नवी मुंबई, सोलापूर या महापालिका तसेच हिंगोली, नंदुरबार हे दोन जिल्हे स्तर दोनमध्ये येत असल्याने तेथील सर्व दुकाने उघडी राहतील. सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने तसेच सरकारी, खासगी कार्यालये, उद्यान, खेळाची मैदाने सुरू होतील. मॉल, उपाहारगृह, चित्रपटगृह, सभागृह क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. लग्नासाठी सभागृह क्षमतेच्या ५० टक्के किं वा जास्तीत जास्त १०० लोकांना परवानगी असेल. व्यायामशाळा, के शकर्तनालय, स्पा येथे पूर्वनोंदणीने ५० टक्के क्षमतेने परवानगी असेल. अंत्यविधीसाठी मर्यादा नसेल. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी रविवारी दुपारी शहरातील निर्बंध शिथिल करण्यासंबंधीचे आदेश काढले.

मुंबई, पुणे, नाशिक, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र स्तर तीनमध्ये येत असल्याने अत्यावश्यक सेवेतील व इतर सारी दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत खुली राहतील. अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. मॉल्स, नाटय़गृहे बंदच राहणार आहेत. उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग सकाळी ५ ते ९ परवानगी असेल. खासगी कार्यालये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के उपस्थितीत सुरू राहतील. चित्रपट, मालिका चित्रीकरण जैव-सुरक्षा परिघात (बायो-बबल) करण्यास परवानगी असून, गर्दी जमेल अशा चित्रीकरणाला परवानगी नाही. सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार परवानगी असेल. लग्न सोहळे ५० लोक उपस्थितीत, तर अंत्यसंस्कारासाठी २० लोक उपस्थित राहू शकतील. व्यायामशाळा, के शकर्तनालय, स्पा येथे पूर्वनोंदणीने ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू राहील. या सर्व ठिकाणी जमावबंदी लागू राहणार असून संध्याकाळी ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू राहील. हेच नियम ठाणे (ठाणे आणि नवी मुंबई महापालिका वगळून) नाशिक, पालघर, वर्धा, अकोला, अमरावती, औरंगाबाद (महापालिका वगळून), बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर (महापालिका वगळून), वाशिम जिल्ह्य़ात लागू असतील.

स्तर चारमधील पुणे, बुलढाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील अत्यावश्यक दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. अन्य दुकाने बंदच राहतील. या जिल्ह्य़ात संचारबंदी कायम राहील. उपाहारगृह केवळ घरपोच सेवेसाठी सुरू राहतील. के शकर्तनालय, व्यायामशाळा ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. या ठिकाणी के वळ लसीकरण झालेल्यांनाच परवानगी असेल. सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग सोमवार ते शुक्रवारी सकाळी ५ ते ९ दरम्यान परवानगी असेल. शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मैदानी खेळ सोमवार ते शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत खेळता येतील, तर सभागृहांतील खेळास बंदी असेल. लग्न सोहळयास २५ तर अंत्यसंस्कारासाठी २० लोक उपस्थित राहण्यास परवानगी, सार्वजनिक बस क्षमतेच्या ५० टक्के आसनक्षमतेने सुरू राहतील. ई-कॉमर्समध्ये के वळ जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणास परवानगी असेल. उद्योग व्यवसाय ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 3:22 pm

Web Title: covid 19 maharashtra chief minister uddhav thackeray pm modi new delhi sgy 87
Next Stories
1 Maharashtra Unlock : एस.टी.चा पुन:श्च हरी ओम
2 सातारा : वीर धरण परिसरात मद्यपान करून हवेत गोळीबार करणाऱ्या नऊ जणांना अटक!
3 केंद्राने एक्साईजमध्ये वाढ करून ग्राहकांची लूट केली; अशोक चव्हाण यांची टीका
Just Now!
X