News Flash

देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाइन वैद्यकीय परिषद

घरी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांच्या योग्य उपचाराचे शिवधनुष्य डॉक्टर्सनी उचलण्याचे उद्धव ठाकरेंचे आवाहन

दरम्यान राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता टाळेबंदी पुन्हा लागू करायची की निर्बंध अधिक कठोर करायचे, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. यावर सरसकट टाळेबंदी नको त्याऐवजी निर्बंध अधिक कठोर करण्यावर मंत्र्यांमध्ये सहमती झाली. तसेच राज्यातच रुग्ण जास्त कसे, अशी शंकाही या वेळी उपस्थित करण्यात आली. त्यामुळे सध्या तरी लॉकडाउन न करण्यावर एकमत झालेलं दिसत आहे.

राज्यातील सर्व डॉक्टर्सना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी करणाऱ्या “ माझा डॉक्टर” या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनव संकल्पनेस झपाट्याने प्रतिसाद वाढत असून आज राज्यभरातील अगदी गाव पातळीवरील सुमारे १७ हजार ५०० फॅमिली फिजीशियन्स, वैद्यकीय चिकित्सक यांच्याशी राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी सुमारे दोन तास संवाद साधून कोविडवरील वैद्यकीय उपचाराबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शंकांचे समाधान केले. इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या राज्याने ऑनलाईन वैद्यकीय परिषद घेऊन उपचारांबाबत फॅमिली डॉक्टर्सना मार्गदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे अशी प्रतिक्रिया येत आहे. विशेष म्हणजे हजारो नागरिकांनी देखील या परिषदेत दर्शक म्हणून हजेरी लावली, तसेच आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत या लढाईत उतरावे, घरीच राहून उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांच्या योग्य उपचाराचे शिवधनुष्य सर्व माझा डॉक्टरांनी उचलावे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या उद्घाटनपर प्रास्ताविकात केले.

“प्राथमिक आरोग्य केंद्रातून करोनावर उपचार” या वनएमडी संस्थेने ही परिषद आयोजित केली होती. राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित यांच्यासह डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशिष भुमकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

घरी असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे उत्तम व्यवस्थापन आवश्यक
कोविड विषाणुला हद्दपार करण्यासाठी चला, आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन काम करू, आज कुटुंबप्रमुख म्हणून मी आपल्याला साद घालत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जगभरात प्रत्येक घराचा एक स्वत:चा कुटुंबाचा डॉक्टर असतो, रुग्ण सर्वात जास्त विश्वास आपल्या याच कुटुंबाच्या डॉक्टरांवर ठेवतात. या डॉक्टरांनाही त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रकृती माहित असते, आजार, सहव्याधी माहित असतात. त्यामुळे आज मला तुमच्या सहकार्याची गरज आहे असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आजही ७० ते ७५ टक्के रुग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला जात नाही, ते घरीच विलगीकरणात राहातात, उपचार घेतात, काहींना तर औषधांचीही गरज पडत नाही पण काही रुग्ण हे काही कालावधीनंतर गंभीर होतात आणि उशीरा दवाखान्यात दाखल होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढतांना दिसते. घरी रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व माझा डॉक्टरांची जबाबदारी आणि भूमिका त्यामुळे अधिक महत्वाची ठरत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाची प्रकृती, त्याला असलेल्या सहव्याधी, त्यांची ऑक्सिजनची पातळी, पहातांना या रुग्णांना योग्यवेळी योग्य उपचाराचे मार्गदर्शन करणे, त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज असेल तर त्यांच्या गरजेनुसार योग्य दवाखान्यात वेळेत दाखल करणे, त्यांच्यावर उपचार सुरु करणे या सर्व गोष्टींकडे त्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने गृहविलगीकरणातील रुग्णांचे उत्तम व्यवस्थापन झाल्यास आपण मृत्यू दर ही कमी करू शकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोविडमुळे रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यात मधुमेह असलेला रुग्ण असल्यास आणखी स्थिती बिकट होते असे सांगून रुग्णांचे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे असल्याकडे ही त्यांनी माझा डॉक्टरांचे लक्ष वेधले.

जवळच्या कोविड रुग्णालयात सेवा द्या
मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाचा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या राज्यभरातील सर्व माझा डॉक्टर्सना त्यांच्या सेवेचा विस्तार करण्याबाबत विनंती केली. मुख्यमंत्री म्हणाले की माझा डॉक्टरांनी त्यांना शक्य असेल तिथे त्यांच्या जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये, रुग्णालयात दिवसाला एकदा तरी जाऊन सेवा द्यावी, त्यामुळे शासनाला सहकार्य तर मिळेलच परंतू आपल्या भागातील डॉक्टर आपल्याला येऊन पाहून गेल्याचा आनंदही रुग्णांना होईल.

पावसाळी आजार रोखणे गरजेचे
आता पावसाळा उंबरठ्यावर असल्याचे सांगून पावसाळ्यात उदभवणाऱ्या सर्दी, ताप,खोकला पडसे यासारख्या आजारांबरोबर मलेरिया, डेंग्यु, लिप्टो सारख्या आजारांना रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असल्याचे व त्यात माझा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांची जबाबदारी फार मोठी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पावसाळ्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मोठ्याप्रमाणात करण्याच्या सुचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सचेही मार्गदर्शन
उपचार पद्धतीत नेमकेपणा आवश्यक असतो, त्यासाठी दिशा दाखवण्याचे काम राज्य टास्कफोर्सचे सदस्य करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना करोना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे, बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स आपण स्थापन केला आहे. आजच्या प्रमाणे येत्या काही दिवसात राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांना या टास्कफोर्सचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, आपण हा कार्यक्रम आयोजित करू. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील सर्व डॉक्टर जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता सैनिकांप्रमाणे रुग्णांचा जीव वाचवण्याचे काम करत असल्याचे म्हटले. डॉक्टरांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न याची आपल्याला जाणीव असून शासन तुमच्यासोबत आहे, तुमच्या अडचणी प्राधान्याने सोडवल्या जातील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी डॉक्टरांना दिला. राज्यातील लसीकरणाची स्थिती, लसींची उपलब्धता याबाबतची स्पष्टताही मुख्यमंत्र्यांनी केली. सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आज बंद आहेत. मग आपल्याला देव कुठे दिसतो तर तो तुमच्या रुपात दिसतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी तुम्हा देवदुतांच्या मदतीने आपण कोविडविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू असा विश्वास ही व्यक्त केला. त्यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व डॉक्टरांचे , तज्ज्ञांचे आभार ही मानले.

टास्क फोर्स डॉक्टर्सचे मार्गदर्शन
करोना उपचारात सहा मिनिटांचा वॉक, पेशंटची ऑक्सिजनची स्थिती, त्याची गरज, बुरशीमुळे होणाऱ्या म्युकर कायकोसिस आजारावरील उपचार, रेमडीसीव्हीरचा वापर, व्हेंटिलेटरवरील रुग्णांची घ्यावयाची काळजी, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, पोस्ट कोविड रुग्णांची घ्यावयाची काळजी, सिटीस्कॅनचा वापर, स्टुरॉईडचा वापर, त्याच्या वापराचे परिणाम दुष्परिणाम, ऑक्सिजनचा सुयोग्य वापर अशा विविध विषयांवर डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशिष भुमकर आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

प्रतिक्रियांचा पाऊस
या आगळ्यावेगळ्या परिषदेच्या आयोजनासाठी अनेक डॉक्टर्स व सर्वसामान्य डॉक्टर्सनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले व धन्यवाद दिले. सुमारे ३ हजारावर प्रतिक्रिया व सूचना प्राप्त झाल्या तर हजार एक लोकांनी हा कार्यक्रम शेअर केला. अशा स्वरूपाचे कार्यक्रम कोविड काळात कायम आयोजित करावेत जेणे करून मार्गदर्शन मिळत राहील असेही अनेकांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 5:08 pm

Web Title: covid 19 maharashtra cm uddhav thackeray task force discussion with doctors sgy 87
Next Stories
1 “८३५ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय मागे घ्‍या,” ठाकरे सरकारकडे मागणी
2 महाराष्ट्राच्या करोना लढ्याला धक्का देणारं चित्र; सोलापुरात जमली हजारोंची गर्दी
3 “गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला”
Just Now!
X