संदीप आचार्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही योजना ज्या आशा स्वयंसेविकांमुळे यशस्वी झाली त्यांचीच ‘जबाबदारी’ टाळून सरकारने या आशांना वाऱ्यावर सोडले आहे. ‘आशां’च्या मागणीचा विचारही न करता हवे तर संप करा, अन्य कर्मचाऱ्यांकडून सरकार आरोग्य विषयक कामे करून घेईल असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढल्यामुळे राज्यातील आशा स्वयंसेविकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना अंमलबजावणी व आरोग्यविषयक प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आतितात्काळ बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच संबंधित विभागांचे सचिव, आरोग्य संचालक, वैद्यकीय शिक्षण सचिव, संबंधित अधिकारी आणि आरोग्य क्षेत्रातील सामाजिक संघटना तसेच आशा संघटनेचे नेते आदी उपस्थित होते. यावेळी ‘आशा’ स्वयंसेविकांना अँटिजेन चाचणी करायला लावू नये ते कुशल व अनुभवी लोकांचे काम असते तसेच मोबदला न देता करोनाची अनेक कामे आशांकडून करून घेणे चुकीचे आहे असे सांगत योग्य मानधन देण्याची भूमिका ‘महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी कृती समिती’चे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी मांडताच आशांनी हवे तर संप करावा आम्ही, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेऊ असे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांचे वक्तव्य करोना काळात गावा गावात जाऊन जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आशांचा अपमान करणारे आहे, असे एम. ए. पाटील म्हणाले. मुळात कुठल्या नियमानुसार तांत्रिक पात्रता नसलेल्या ‘आशा’ना अँटिजेन चाचणी करायला सांगितली जाते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अजित पवारांच्या मनात आले तर एखाद्या क्लार्कला ते उद्या शस्त्रक्रिया करायलाही सांगू शकतात, असा टोला एम. ए. पाटील यांनी लगावला.

महाराष्ट्रात ७२ हजार आशा व गटप्रवर्तक यांच्या माध्यमातून राज्यातील गावागावात आरोग्य विषयक ७२ प्रकारची कामे केली जातात. गर्भवती महिलेची आरोग्य काळजी घेणे, रुग्णालयात दाखल करण्यास मदत करण्यापासून बालकांच्या लसीकरण कामात मदत तसेच घरोघरी जाऊन आरोग्य विषयक वेगवेगळ्या नोंदी घेणे, साथीच्या आजारात मदत करण्यासह कामे करावी लागतात. यासाठी मिळणारा मोबदला सुमारे साडेतीन हजार एवढा असतो. करोना काळात आरोग्य विभागाने करोनाची वेगवेगळी कामे या आशांना करायला सांगितली. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजना राबविण्याची संपूर्ण जबाबदारी आशांच्या माध्यमातून पार पाडण्यात आली. सध्या आशां कार्यकर्त्यांना सरकारकडून चार हजार व केंद्र सरकारकडून एक हजार करोना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. याबदल्यात त्यांना घरोघरी जाऊन करोना विषयक वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी ठेवाव्या लागतात. लसीकरण शिबिराला मदत करण्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात गरजेनुसार मदत करावी लागते. यात आरोग्य विभागाच्या ७२ कामांसाठी वेळ देता येत नसल्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. जवळपास आठ तास करोनासाठी काम करणाऱ्या आशांना हातमोजे व मास्क मात्र पुरेसे दिले जात नाही, असे अनेक आशांचे म्हणणे आहे. सॅनिटाइजर महिन्यातून कधीतरी दिला जातो अशी आशांची तक्रार आहे. परिणामी शेकडो आशा कार्यकर्त्यांना आजपर्यंत करोनाची लागण झाली असून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना उपचाराची योग्य व्यवस्था मिळावी अशी मागणी एम. ए. पाटील यांनी केली आहे. आशा कार्यकर्त्यांनी रॅपिड अँटिजेन चाचणी करावी असा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी आशांना प्रशिक्षण दिले जाईल असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. कोणतेही अधिकृत तांत्रिक शिक्षण नसलेल्या अकुशल आशांकडून अशांना विनामोबदला अँटिजेन चाचणी कोणत्या नियमानुसार करायला लावता हा आशा व त्यांच्या संघटनांचा प्रश्न आहे. करोना काळात कोणताही योग्य मोबदला न देता आशांना वेठबिगारासारखे राबवून घेतले जात आहे व आता अँटिजेन चाचणी करायला सांगता हा अन्याय असून याविरोधात संप करण्याची भूमिका आशा संघटनांनी मांडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील बैठकीत आशांचा अँटिजेन चाचणी करण्याला असलेला विरोध व योग्य मोबदला मिळावा अशी भूमिका एम. ए. पाटील यांनी मांडली. यावर आशांनी संप करावा सरकार तृतिय व चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांकडून आरोग्य विषयक कामे करून घेईल असे अजित पवार यांनी सांगितले. याबाबत एम. ए. पाटील यांना विचारले असता करोना काळात संप करायची आमची इच्छा नाही. मानधन वाढ झाली नाही तर १५ जूननंतर संप करण्याचा इशारा आम्ही दिला आहे. आशांनी संप केला तर ग्रामीण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडेल याची कल्पना असूनही अजित पवार यांनी बेलगाम वक्तव्य केले आहे. गेले वर्षभर गावागावात घरोघरी जाऊन करोना विषयक माहिती गोळा करणे, रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच लसीकरण कामात मदत करून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना संप करण्याचे आव्हान अजित पवार यांनी देऊन आशांचा अपमान केला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर नक्कीच आशांचा संप होईल. त्यावेळी अजित पवार यांनी आपला ‘माज’ असाच कायम ठेवून दाखवावा, असे आव्हान आशा संघटनांचे नेते एम. ए. पाटील यांनी दिले आहे.