यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात करोना संसर्ग वेगाने पसरत असून गुरूवारी करोनाबाधितांचा आकडा ५०० पार पोहोचला. दिवसभरात १५ नवीन करोना रूग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ५०३ इतकी झाली. करोनामुक्त असलेल्या राळेगाव तालुक्यातही आज हा संसर्ग पोहोचला. या तालुक्यातील निधा गावात एका महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला. १५ रूग्णांपैकी पाच जणांचे अहवाल प्रयोगशाळेतून तर १० जणांचे आहवाल ‘ॲन्टीजन रॅपीड’ चाचणीद्वारे पॉझिटिव्ह आले.

आजच्या रूग्णांमध्ये आठ पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील कळंब चौक येथील एक पुरुष, सायखेडा येथील एक पुरुष, राळेगाव तालुक्यातील निधा येथील एक महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील नायगाव येथील एक महिला, आर्णी तालुक्यातील केळझरा येथील एक महिला, नेर शहरातील लक्ष्मी नगर येथील चार पुरुष व चार महिला आणि वणी शहरातील तेलीफैलातील एका पुरूषाचा समावेश आहे.

गुरुवारी सक्रिय पाॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५६ वर पोहचली होती. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेले चार रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १५२वर आली. जिल्ह्यात आतापर्यंत सकारात्मक रुग्णांची संख्या ५०३ वर पोहचली आहे. यापैकी ३३६ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. तर १५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या विलगीकरण कक्षात १५५ संशयित रूग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सांगितले आहे.