News Flash

महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाउन कायम?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत

करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लॉकडाउन लावण्यात आला आहे. ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. एकीकडे राज्य करोनाच्या संकटाला सामना देत असताना दुसरीकडे तौते चक्रीवादळाच्या निमित्ताने अजून एका संकटाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान पावसाळा तोंडावर आला असताना सरकारसमोरील आव्हानं वाढण्याची शक्यता असून लॉकडाउन वाढणार की उठवणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. यादरम्यान राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लॉकडाउनवर भाष्य केलं आहे. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून असेल. राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून प्रत्येकाने चाचणी करावी यासाठीही पुढाकार घेत आहोत. करोना रुग्णसंख्या किती आहे यावरच लॉकडाउन उठवला जावा की वाढवला जावा हे अवलंबून असेल. आरोग्य आणि सुरक्षा आमची प्राथमिकता असणार आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “लॉकडाउन असला तरी राज्यात महत्वाची कार्यालयं, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरु आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडायला मिळेल असं विचारत असाल तर ते पूर्णपणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे”.

आदित्य ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेवरही भाष्य केलं. “आम्ही राज्यासाठी जास्तीत जास्त लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. जागतिक स्तरावरही प्रयत्न सुरु आहेत. जर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करावं लागेल,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

“महाराष्ट्रात सर्वात जलद गतीने लसीकरण होत आहे. आम्ही आतापर्यंत दोन कोटी लोकांचं लसीकरण केलं आहे. लसीकरणासाठी सर्व गोष्टी व्यवस्थित जागेवर असून जास्तीत जास्त पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न आहेत. ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी लसीसकरण करण्याचं आव्हान सध्या आमच्यासमोर आहे,” असं आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी तौते आणि निसर्ग चक्रीवादळाचा उल्लेख करत आम्ही एक वर्षात दोन मोठ्या वादळांचा सामना केला असून भविष्यात अशा परिस्थितीत लोकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं सांगितलं.

तिसऱ्या लाटेसाठी करण्यात येणाऱ्या तयारीबद्दल बोलताना ते म्हणाले की, “सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री याविषयी सतत चर्चा करत आहेत. राज्याकडून कशा पद्दतीने परिस्थितीला सामोरं जायचं याकडे लक्ष आहे. यासाठी टास्क फोर्स मार्गदर्शन करत आहे. कुठे याचा फटका बसण्याची शक्यता आहे याकडे लक्ष देत आहोत. तसंच कोविडच्या नियमांचं पालन करणं महत्वाचं ठरणार आहे. याशिवाय उद्योग सुरु ठेवणं महत्वाचं असून त्याचं नियोजनही महत्वाचा भाग असेल”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 1:18 pm

Web Title: covid 19 shivsena maharashtra minister aditya thackeray on lockdown sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आळंदी : वारकरी संस्था चालकाकडून ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य; आरोपी अटकेत
2 तौक्ते चक्रीवादळामुळे भाईंदरमधील इमारतीचा भाग खचला; ७२ जणांची सुखरूप सुटका
3 पुणेकराची कमाल! कचरा उचलण्यासाठी बनवलं अनोखं मशीन
Just Now!
X