करोनाचा थैमान थोपवण्यासाठी राज्य सरकार आणि शासकीय यंत्रणा जिद्दीनं लढत आहेत. या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळत असल्याचंही दिसून येत आहे. मात्र, तरीही राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा चिंतेत भर टाकत आहे. करोनामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री बैठक बोलावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार आहेत.

“महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी ३४ जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची स्थिती चिंता व्यक्त करावी अशीच आहे. राज्यात होत असलेला करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुढे काय करता येईल, यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक बोलावणार आहोत. त्या बैठकीत आगामी नियोजनासंदर्भात कृती धोरण ठरवलं जाईल,” असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं.

देशात करोनाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील संख्या तब्बल १५ हजार ५२५ इतकी आहे. यापैकी २ हजार ८१९ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तर ६१७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक फटका देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांना बसला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत तब्बल १० हजार जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तर पुण्यातील आकडा २ हजारांच्या पुढे गेला आहे.