करोना उपचार केंद्रांची बिकट अवस्था, रुग्ण भयभीत;  घरी अलगीकरण करण्याची मागणी

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : करोना रुग्णांच्या अलगीकरण, विलगीकरण व उपचार केंद्रांवर गैरसोयी आढळून आल्याने या केंद्रांनाच आता उपचारांची गरज भासू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने करोना रुग्णांच्या उपचारार्थ सुरू करण्यात आलेल्या केंद्रांमधील स्वच्छता व इतर सोयीसुविधा व्यवस्था पाहण्यासाठी  स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमले असले तरीसुद्धा अशा केंद्रांत दाखल होणाऱ््या  नागरिकांना मोठय़ा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडय़ात करोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाटय़ाने वाढ झाल्याने त्यांच्या  संपर्कात असलेल्या संशयित रुग्णांची संख्या देखील काही पटीने वाढ झाली आहे. अशा रुग्णांना अलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे.  अशा केंद्रांमधील या संभाव्य रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे त्यापैकी अधिकतर रुग्णांची चाचणी नकारात्मक येत असली तरीसुद्धा त्यांना  केंद्रामधील संसर्गित रुग्णांसोबत ठेवले जात आहे.  त्यांच्या सोबतीने काही दिवस एकत्र घालवणे भीतीदायक असल्याचे अनेकांनी सांगितले. सर्व साधारणपणे घशाच्या नमुन्याचे अहवाल दोन-अडीच दिवसांनी येत असतात तर काही वेळा निकाल मिळण्यास चार दिवसांतून अधिक काळ लागत असल्याने अशा तणावपूर्ण परिस्थितीत रुग्णांना राहावे लागत आहे. विशेष म्हणजे अशा सर्वच संभाव्य रुग्णांना एकत्रितपणे रुग्णवाहिकेतून केंद्रावर आणले जात असल्याने  प्रवासादरम्यानही संसर्ग वाढत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

करोना संसर्ग झालेल्या रुग्णांना विलगीकरण अथवा उपचार केंद्रावर पाठवण्यात येते. अशा ठिकाणी स्वच्छतेचा प्रमुख मुद्दा असून अनेक ठिकाणी शौचालयांमधून दुर्गंधी बाहेर येत असते. अशा केंद्रांवर पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने स्वच्छता राखणे तसेच सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने नियमित सफाई करणे प्रशासनाला कठीण होत आहे. शिवाय अनेक रुग्णांना शौचास साफ होण्याच्या गोळ्या दिल्या जात असल्याने दिवसात दोन-तीनदा शौचालयात जाणे गरजेचे होत आहे. काही आरोग्य केंद्रांवर शौचालयाच्या टाक्या ओसांडून वाहत असल्याने अस्वच्छतेचा वातावरण पसरले आहे. अशामध्येच दाखल  रुग्णांना त्यांची न्याहारी व जेवण करावे लागत आहे.

आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना वाफ किंवा गरम पाणी घेण्यासाठी वीजयंत्रणा उपलब्ध नाही. त्यातच विजेचा धक्का बसणे असे प्रकारही घडत आहे.   पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण उपकरण बंद असल्याने कूपनलिकेतील किंवा उपलब्ध असणारे अशुद्ध पाणी पिणे रुग्णांना भाग पडते.  डासांचा तर रात्रभर मोठा प्रमाणात उपद्रव असतो,  पुरेशा प्रमाणात परिचारिका किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचीदेखील उपस्थिती नसते तसेच खाद्यपदार्थाचा दर्जाही नसतो अशा तक्रारी आहेत.  अशा परिस्थितीत  करोनाऐवजी इतर आजारांनी ग्रासले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.   आम्हाला अशा विलगीकरण कक्षाऐवजी  राहत्या घरीच उपचार घेण्याची मुभा द्यावी अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.

रुग्णवाहिकांमधील भीतीदायक प्रवास

जिल्ह्यात १०८ मदत वाहिनीवरील अकरा रुग्णवाहिका करोना संदर्भातील रुग्णांच्या वाहतुकीसाठी कार्यरत आहेत. पालघर ग्रामीण रुग्णालय, मनोर ग्रामीण रुग्णालय, बोईसर टिमा रुग्णालय, डहाणू कॉटेज रुग्णालय, रिवेरा रुग्णालय, जव्हार, मोखाडा, मांडवी प्राथमिक आरोग्य केंद्र, जुचंद्र, वसई पेटिट रुग्णालय तसेच रिद्धिविनायक रुग्णालय नालासोपारा येथे या रुग्णवाहिका स्थित आहेत. गेल्या पंधरवडय़ात रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली असल्याने या रुग्णवाहिकांवरील ताण वाढला असून अनेकदा अशा रुग्णवाहिकेतून सात ते नऊ रुग्ण कोंबून भरले जातात, असे पाहण्यात आले आहे. जिल्ह्यात अन्य प्रकारच्या रुग्णांसाठी १८ स्वतंत्र रुग्णवाहिका कार्यरत असून करोनाच्या रुग्णांसाठी  रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.

चाचण्या संदर्भात आक्षेप

काही घटनांमध्ये नागरिकांना ते करोनाबाधित असल्याचे शासकीय विभागांकडून कळविण्यात आल्यानंतर त्यांनी लगेच खाजगी ठिकाणे चाचणी केल्यानंतर काहींचे चाचणी अहवाल नकारात्मक आल्याच्या घटना पुढे आले आहेत. तर काही ठिकाणी बाधित रुग्णांनी आपले स्वत:चे अहवाल मागितल्यानंतर शासकीय विभागांकडून टोलवाटोलवी केल्याच्या देखील तक्रारी करण्यात येत आहेत.