नगर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयावर पडणारा भार लक्षात घेऊन कर्जत—जामखेडमधील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातुन नगर  शहरातील पोलिस कवायत मैदानावर ३०० खाटांचे  कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे प्राणवायूचा सुविधाही उपलब्ध आहे.

कर्जत—जामखेड एकात्मिक विकास संस्था व महापालिकेच्या सहकार्यातून हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. रोहित पवार, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, आ. डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.

आ. रोहित पवार यांनी कर्जत व जामखेडमध्ये प्रत्येकी १ हजार अशा एकूण २ हजार खाटांचे कोविड सेंटर सुरू केले आहे. त्याचा रुग्णांना उपयोग होत आहे. परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण मोठय़ा संख्येने नगर शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे शहरातील आरोग्य सेवेवर ताण निर्माण झाला आहे. हे लक्षात घेऊन शहरातील पोलीस कवायत मैदानावर ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

या कोविड सेंटरसाठी जिल्हा सरकारी रुग्णालय, आ. जगताप व मनपाचे सहकार्य मिळाले. त्यांच्या माध्यमातून आवश्यक मनुष्यबळ, जेवण पुरवण्यात येणार असून स्वच्छता, दैनंदिन नियोजनाची जबाबदारी मनपा पाहणार असल्याचे आ. पवार यांनी सांगितले.

गरजेप्रमाणे क्षमता वाढवू

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून नगर शहरातील  रुग्णालयांत मोठय़ा संख्येने करोनाबाधित उपचारासाठी यम्ेतात. येथील आरोग्य सुविधेवर ताण पडू नये म्हणून पोलीस कवायत मैदानावर ही पर्यायी व्यवस्था आहे. गरजेनुसार खाटांची क्षमताही वाढवण्यात येईल. रुग्णांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये व चांगले उपचार मिळून रुग्ण लवकर बरे व्हावेत हा एकमेव मानस आहे. आ. रोहित पवार.