News Flash

“…नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या; सत्य स्वीकारा!”

खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार, भाजपाला सुनावलं

गंगेच्या पात्रात शेकडो मृतदेह पुरण्यात आले आहेत. (छायाचित्र । रॉयटर्स)

“लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत आणि हे महाशय म्हणतात, चारशे जागा जिंकू”, असं म्हणत शिवसेनेचे आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह दिल्लीतील मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहे. देशातील करोनामुळे बिकट झालेली परिस्थिती, दररोज होणारे मृत्यू आणि गंगेत वाहून येणारी प्रेते या मुद्द्यांवर बोट ठेवत राऊत यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. देशात मंदावलेल्या लसीकरणावरूनही राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला असून, “राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे जे पाहतील त्यांनाच सभोवतालचे सत्य दिसेल,” असा हल्ला राऊत यांनी चढवला.

शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर प्रहार केला आहे. देशातील करोना परिस्थिती, लसीकरण, बंगालमधील राजकारण आणि करोनामुळे होत असलेल्या मृत्यूवरून राऊत यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. “करोनाचे संकट कायम असताना महाराष्ट्रावर चक्रीवादळाने हल्ला केला. त्या पडझडीत मोठे नुकसान झाले. अशा वेळी राजकारण थोडे बाजूला ठेवून देशासाठी व राज्यासाठी काम करणे गरजेचे आहे. पण प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत या संकटकाळातही राजकारण सुरूच आहे. महाराष्ट्रातील भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी याही परिस्थितीत सांगितले की, आज निवडणुका घेतल्या तरी भाजपाला ४०० जागा मिळतील. यावर निखिल वागळे यांनी त्यांना चांगले उत्तर दिले आहे. आधी गंगेतून वाहून आणलेले मृतदेह उचला, मग निवडणुकांचं बघू! लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत आणि हे महाशय म्हणतात, चारशे जागा जिंकू. (कोठून आणतात हे इतका आत्मविश्वास?) देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजिल आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत. भाजपाच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना विचारले, ‘साध्वीजी, आपण करोनापासून कसा बचाव करीत आहात?’ यावर साध्वीजींनी सांगितले, ‘सोपे आहे. मी रोज गोमूत्र प्राशन करते. गोमूत्रामुळेच करोना माझ्यापर्यंत पोहोचला नाही!’ भारतातील गोमूत्र प्राशनावर रशियासह अनेक देशांतील वृत्तपत्रांनी आपली चेष्टा केली आहे. गंगेत जे हजारो करोनाग्रस्त मृतदेह सोडून दिले व त्यांच्यावर धड अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत, त्यांच्यापर्यंत हा गोमूत्र संदेश गेला असता, तर त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती. गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांनी हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला,” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीकेचा बाण सोडला.

खरं कोण बोलतंय?

“जिवंत माणसं खोटे बोलतील, पण मृत्युशय्येवरील माणूस सहसा खोटे बोलत नाही. पण आता तर गंगेत तरंगणारे, प्रवाहात वाहत येणारे हजारो मुडदेच सत्य बोलत आहेत. ‘होय, आम्ही करोनामुळे मेलो. आम्ही मेल्याचे आकडे लपवण्यात आले. आम्हाला जाळायला, पुरायलाही जागा नसल्याने गंगेच्या प्रवाहात आम्हाला सोडून दिले…’ हा मुडद्यांचा आक्रोश आहे. त्यांचा आवाज कसा ऐकणार? प्रेते तरंगत आहेत. देश बुडत आहे. देशात आतापर्यंत २८० डॉक्टरांनी करोना संसर्गाने प्राण गमावले. महाराष्ट्रातील ६८ डॉक्टर्स त्यात आहेत. देशात दोन हजारांवर शिक्षक प्राणास मुकले. इंडियन मेडिकल असेसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल हे अखेरच्या क्षणापर्यंत कोविडसंदर्भात लोकांना मार्गदर्शन करीत होते. मंगळवारी तेसुद्धा करोनामुळे गेले. सर्वत्र हाहाकार माजला असताना आपल्या देशात काय चालले आहे? प. बंगालात सीबीआयचे लोक घुसले व त्यांनी बेकायदेशीरपणे ममता सरकारातील दोन मंत्री व दोन आमदारांना अटक केली. या मंत्र्यांना अटक करण्याची परवानगी विधानसभा अध्यक्षांनी दिलीच नव्हती. मुळात ज्या प्रकरणात या अटका झाल्या त्या ‘नारदा’ स्टिंग प्रकरणात भाजपाचे सध्याचे प्रमुख नेते हातभर फसले आहेत. त्या लाचखोरीत सुवेंदू अधिकारी या पलटीरामाचे नाव आहे. अधिकारी यांनी पाच लाख रुपये स्वीकारल्याचे त्या चित्रफितीत दिसते. पण हे अधिकारी महाशय ममतांना सोडून भाजपामध्ये आले. त्यामुळे त्यांना अटक झाली नाही. राज्यपाल धनकड यावर मौन बाळगून आहेत व त्यांची नौटंकी चालू आहे. ज्यांच्या अटकेची परवानगी त्यांनी दिली त्या दोन मंत्र्यांना राजभवनात शपथ देण्याचे घटनात्मक कार्य याच राज्यपालांनी पार पाडले. या दोन भ्रष्ट मंत्र्यांना आपण शपथ देणार नाही. कारण त्यांच्या अटकेबाबतचे सीबीआयचे पत्र राजभवनात आले आहे, असे त्यांना सांगता आले असते. दुसरे असे की, ज्या नारदा प्रकरणात तृणमूलच्या मंत्री व आमदारांना अटक केली त्या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले. मग सीबीआयने त्यांना अटक करण्याचे कारण काय? याचा अर्थ स्पष्ट आहे की, हे सर्व प्रकरण राजकीय सूडबुद्धीनेच केले जात आहे. भ्रष्टाचाराच्या एकाच पुराव्याच्या आधारे सहाजणांना पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडले जाते. त्याच पुराव्याच्या आधारे चौघांना अटक होते. उरलेले दोघे भाजपावासी झाल्याने सीबीआयने त्यांना सोडून दिले. सध्या भाजपावासी असलेल्या मुकुल रॉय यांना तर १५ लाख दिले व रॉय यांच्या वतीने ही रक्कम एका पोलीस अधिकाऱ्याने स्वीकारली. प्रश्न तृणमूल काँग्रेसच्या चार नेत्यांना का अटक केली हा नाहीच, तर याच प्रकरणात अडकलेले इतर दोन नेते का सोडले? हा आहे. ‘नारदा’ने पकडलेल्या सहाच्या सहा लोकांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असते तर सीबीआयच्या कारवाईवर कोणीच प्रश्न विचारले नसते. पण भाजपामध्ये गेले ते सुटले हा मुद्दा आहे. ममता बॅनर्जी या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या याचा सूड घेतला जात आहे. करोना काळातील भयंकर संकटातही राजकारण थांबवले जात नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांच्या अटकेसाठी सीबीआय सर्वत्र धाडी घालत आहे. या धाडसत्राने महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण होईल व सरकार पडेल, असे कुणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे,” असं सांगत राऊत यांनी दिल्लीतील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

लस कोठे गेली?

“‘मोदीजी, आमच्या मुलांची लस तुम्ही परदेशात का पाठवली?’ अशी विचारणा करणारी पोस्टर्स दिल्लीच्या भिंतीवर कुणीतरी चिकटवली आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या २५ गरीब मुलांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात डांबले. आता मुंबईत काँग्रेसने तीच पोस्टर्स उघडपणे लावली. देशात लसीचा तुटवडा आहे व लसीकरण थांबले आहे. भारत सगळ्यात मोठा ‘व्हॅक्सिन उत्पादक’ देश आहे. सरकारने १२ एप्रिलला ‘लस उत्सव’ साजरा केला, पण लसीचा ठणठणाट होता. गेल्या ३० दिवसांत लसीकरणात ८० टक्के घसरण झाली. पंतप्रधान मोदी हे लस बनवणाऱ्या फॅक्टऱ्यांत जाऊन आले. त्याने काय साध्य झाले? अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी भारतातील लस उत्पादक कंपन्यांना आधीच ‘मोठी’ ऑर्डर देऊन ठेवली होती. त्यामुळे भारतात बनलेली ही लस आधी मोठ्या प्रमाणावर परदेशात पोहोचली व भारतात प्रेतांचे खच पडले. मुडदे गंगेत तरंगत राहिले. ‘मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली?’ हा प्रश्न त्यामुळे चुकीचा ठरत नाही. राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रूपात वाहताना आणि तरंगताना आपण पाहिला. यावर जे बोलतील ते आता राष्ट्रद्रोही ठरतील. संपूर्ण जग करोनाशी लढण्याची रणनीती ठरवण्यात गुंतले असताना आमच्या देशाचे नेतृत्व निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवण्यात गुंतून पडले. अमेरिका ‘मास्कमुक्त’ झाला. इस्रायल करोनामुक्त झाला. युरोपातील अनेक राष्ट्रे सावरली. चीनने करोनावर विजय मिळविला व मोठी आर्थिक झेप घेतली. आम्ही करोना काळातही निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ करत बसलो. परिणाम काय? तर गंगेत प्रेते वाहताना आम्ही पाहिली. आता करोनाची तिसरी लाट येत आहे. काय सांगावे? लाटांवर लाटा येतच जातील व प्रत्येक लाटेने देश कोलमडून जाईल. या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आमच्या राज्यकर्त्यांकडे नाही. गंगा ही पापाच्या शुद्धीकरणासाठी होती. आज गंगेचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही. राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे जे पाहतील त्यांनाच सभोवतालचे सत्य दिसेल. नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या; सत्य स्वीकारा!,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 7:56 am

Web Title: covid crisis in india dead bodies found on river banks pm narendra modi sanjay raut rokhthok vaccination bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उपचाराबरोबरच बाधितांच्या बालकांवर छत्रछाया
2 चला जाऊ, प्राणवायू प्रकल्प पाहू!
3 ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ‘खेडय़ाकडे चला’चा उपक्रम
Just Now!
X