रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधल्या एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने चक्क डॉक्टरवरच हल्ला चढवला आहे. ऑक्सिजन मास्क काढू नका असं सांगितल्याने या रुग्णाने डॉक्टरला सलाईनच्या स्टँडने मारल्याची घटना समोर येत आहे. याबद्दल पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. बुधवारी ही घटना घडली.

या घटनेचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. या वृत्तानुसार, अलिबागच्या सरकारी रुग्णालयातल्या कोविड वॉर्डमध्ये एक ५५ वर्षीय रुग्ण उपचार घेत आहे. त्याला ऑक्सिजन मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र हा रुग्ण वारंवार आपला मास्क काढत होता. हे पाहून डॉक्टरांनी त्याला मास्क काढण्यापासून रोखलं. मात्र त्याने रागाच्या भरात या डॉक्टरवरच हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. स्वप्नदीप थळे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गेल्या चार दिवसांपासून हा रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. राऊंडच्या दरम्यान डॉक्टर त्याला वारंवार सूचना करत होते की तुझा ऑक्सिजन मास्क काढू नकोस. मात्र, डॉक्टरांच्या या सततच्या सूचनांमुळे हा रुग्ण फारच चिडला होता. नंतर जेव्हा डॉक्टर खुर्चीवर बसले होते. त्यावेळी हा रुग्ण पाठीमागून आला आणि हातातल्या सलाईनच्या स्टँडने त्याने डॉक्टरांना मारायला सुरुवात केली.

या हल्ल्यामुळे हे डॉक्टर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या रुग्णाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.