News Flash

रायगडमध्ये करोना रुग्णवाढीचा दर चढाच

अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, महाड, मुरुड येथील रुग्णवाढ चिंताजनक आहे.

हर्षद कशाळकर,लोकसत्ता

अलिबाग— राज्यात सध्या करोनाचा सर्वाधिक संक्रमण दर सध्या रायगड जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा करोना संक्रमण दर सध्या १४.२८ टक्कय़ांवर आहे. त्यामुळे चाचण्या वाढवणे आणि करोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे यावर भर देणे गरजेचे आहे.     राज्याची टाळेबंदी मुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे. साप्ताहिक करोनाबाधितांचे प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची संख्या लक्षात घेऊन पाच स्तरात निर्बंध शिथील करण्यास सुरवात झाली आहे. यात रायगड जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला आहे. करोनाचा चढा संक्रमण दर यास कारणीभूत ठरला आहे.     रायगड जिल्ह्यात सध्या ६ हजार ६७६ उपचाराधीन रुग्ण आहेत. यात प्रामुख्याने अलिबाग मधील १ हजार २२७, पनवेल मनपा हद्दीतील १ हजार १८४, रोहा येथील ७७३, पनवेल ग्रामिण मधील ६९७, पेण मधील ६६५, उरण ३४३, खालापूर ३३१, माणगाव २८५, महाड २०१, मुरुड २५९ श्रीवर्धन १८२, कर्जत १५५ रुग्णांचा समावेश आहे. अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, महाड, मुरुड येथील रुग्णवाढ चिंताजनक आहे.

पनवेल मनपा आणि पनवेल ग्रामिण मधील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी उर्वरीत रायगड जिल्ह्यातील ग्रामिण भागात करोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी होत असल्याचे दिसून आलेल नाही. उलट काही तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा रुग्णवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. २५ मे ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजार ५०६ चाचण्या करण्यात आल्याय यात ४ हजार ८८ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. आठवडय़ाभरात १४६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. या आठवडय़ात रुग्ण वाढीचा दर हा १४.२८ टक्के होता. राज्यातील इतर कुठल्याही जिल्ह्याच्या तुलनेत हा दर अधिक आहे. या आधीच्या आठवडय़ात रुग्ण वाढीचा दर हा १८ टक्कय़ांवर होता. हीबाब लक्षात घेतली तर जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव अजूनही आटोक्यात येत असल्याचे दिसून येत नाही.      ही  बाब लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रायगड जिल्ह्यात येऊन करोना परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कानही टोचले आहेत. जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत करोना चाचण्यांचे प्रमाण हे खूपच कमी असल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदवले.

विशेषत: ग्रामिण भागात जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाने करोना चाचण्याचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कॉन्ट्रक्ट ट्रेसिंगवरही भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे रुग्णवाढीचा दर कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे आहे.

रुग्णवाढीचा आटोक्यात न येण्यामागची कारणे

जिल्ह्यात करोना विषयक निर्बंधांचे फारसे पालन केले गेले नाही. प्रशासकीय यंत्रणांनी टाळेबंदीच्या कठोर अमंलबजावणीकडे दुर्लक्ष केले. लग्नसमारंभातील होणारी गर्दी रोखण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. आंतरजिल्हा वाहतूकीवर निर्बंध असतांना, जलप्रवासी वाहतूक निर्धोक सुरु होती. ग्रामिण भागात अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेले दुकाने सुरुच होती. बाजारपेठामधील गर्दी रोखण्यासाठी फारसे प्रयत्न झालेच नाहीत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाईकडे यंत्रणांनी दुर्लक्ष केले. कामगार नाक्यांवरील गर्दी रोखण्याचाही प्रयत्न झाला नाही. करोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यावर भर दिला गेला नाही. करोना बाधितांवर गृहविलगीकरणात उपचार करण्यावर भर दिला गेला. संस्थात्मक विलगिकरणाकडे दुर्लक्ष केले. इतर जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना थोपविण्याकडेही दुर्लक्ष केले गेले. या सर्व कारणामुळे जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकलेला नाही.

चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवे…

करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर देणे, करोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे, संस्थात्मक विलगिकरण करून रुग्णांवर उपचार करणे आणि करोना विषयक नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट अधिक आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही लाटेत हाच कल दिसून आला होता. या मागची कारणे अनेक आहेत. बरेचदा खाजगी तपासणी केंद्रांवरील नकारात्मक आलेल्या चाचण्यांचे रिपोर्ट कळविण्यास उशीर होतो. त्यामुळे चाचण्याहोऊनही त्यांची नोंद होत नाही. करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आणि कॉन्टँक्ट ट्रेंसिग वाढविणे या दोन पातळ्यांवर आपल्याला काम करावे लागले.

– डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकीत्सक रायगड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 2:25 am

Web Title: covid positivity rate high in raigad district zws 70
Next Stories
1 सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृत्यूदर वाढला
2 परभणीत गर्दीमुळे वाहतूक कोंडी
3 देशात महागाई वाढीला मोदी सरकार जबाबदार – खा. धानोरकर
Just Now!
X