राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. याबाबत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली. करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १८ वर्षांखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यात तातडीने ‘पेडीयाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती केली जाणार असल्याचं यावेळी टोपेंनी सांगितलं.

याबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, “करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अगोदरच काही महत्वाचे निर्णय घेत आहोत, कारण त्याबद्दलचं सूतोवाच केंद्र शासनाने केलेलं आहे. त्यामुळे आम्ही राज्यात पेडीयाट्रीक टास्क फोर्स ताबडतोब तयार करत आहोत.”

राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या टप्प्यातही वयानुसार गट पडणार? आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत!

तसेच, “पेडीयाट्रीक टास्क फोर्सचा अर्थ असा की, जी आता १८ वर्ष वयापेक्षा लहान गटातील मुलं-मुली आहेत. त्यांचं आपण लसीकरण करत नाही आहोत, त्यामुळे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने लागणारे बेड, पेडीयाट्रीक व्हेंटीलेटर किंवा जे काही वेगळ्या पद्धतीचे बेड लागतात ते देखील आपल्याला तयार करून ठेवले पाहिजेत. या पार्श्वभूमीवर काल(गुरूवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री १० वाजता व्हीसी घेऊन अनेक पेडीयाट्रीशन्सशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपण या दृष्टीने देखील तयारी करत आहोत.” असंही टोपेंनी सांगितलं.

Corona Third Wave : आरोग्यमंत्री टोपेंकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना, म्हणाले…

“बेडची संख्या वाढवण्याचा विषय असेल, ऑक्सिजन व कोविड संदर्भातील औषधांबाबत स्वयंपूर्ण होण्याचा विषय असेल, याबाबत आपली संपूर्ण तयारी सुरू आहे.” अशी देखील आरोग्यमंत्री टोपेंनी यावेळी माहिती दिली.