राज्यातील करोनास्थिती काहीशी चिंताजनक झाल्याचं चित्र आहे. कारणं, चाचण्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येमध्ये मंगळवारी (१४ सप्टेंबर) २० टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्येत देखील किरकोळ स्वरूपाची वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यात मंगळवारी ३ हजार ५३० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. हा नव्या करोना बाधितांचा आकडा सोमवारी (१३ सप्टेंबर) २ हजार ७४० इतका होता. त्यामुळे, तुलनेने ह्यात चांगलीच वाढ झाली आहे. तर याच एका दिवसात राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा देखील २७ वरून ५२ वर पोहोचला आहे. दुसरीकडे, मुंबईत गेल्या २४ तासांच्या कालावधीत नव्या करोना बाधितांची संख्या ३४५ वरून थेट ३६७ वर पोहोचली आहे.

गेल्या पाच दिवसांमध्ये गणेशोत्सवामुळे राज्यातील करोना चाचण्यांचं प्रमाण कमी झालं होतं. त्यानंतर, आता राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना पुन्हा करोना चाचण्यांची संख्या वाढवण्यास सांगितलं आहे. आकडेवारीनुसार, राज्यात दररोज सरासरी २.५ लाख करोना चाचण्या केला जातात. मात्र, १२ सप्टेंबर रोजी हा दैनंदिन चाचण्यांचा आकडा अर्ध्याहून जास्त खाली म्हणजे १.१ लाखांवर घसरला. तर १३ सप्टेंबर रोजी हे प्रमाण वाढून राज्यात साधारणतः १.४ लाखांहून अधिक करोना चाचण्यांची नोंद झाली आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सणांच्या सुट्ट्या आणि लोकांमध्ये असलेली अनिच्छा यामुळे करोना चाचण्यांची संख्या किंचित कमी झाली आहे.

…म्हणून चाचण्यांचं प्रमाण घटलं!

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, “सणांच्या सुट्ट्या आणि अन्य काही कारणांमुळे गेल्या काही दिवसांत करोना चाचण्यांचं प्रमाण काहीसं कमी झालं आहे. परंतु, आम्ही इतर काही जिल्ह्यांपेक्षा दररोज मोठ्या संख्येने चाचण्या करत आहोत.” मंगळवारी बीएमसीच्या करोना अपडेटमध्ये म्हटलं आहे की, गेल्या २४ तासांत २८ हजार ४९८ चाचण्या करण्यात आल्या. परिणामी, शहरात ३६७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईतील रुग्णसंख्येपैकी सहा मुलं ही जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील ओबेरॉय स्प्लेंडर सोसायटीतील होती. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितलं की, मुलांनी वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. त्यापैकी एकाला लक्षणं दिसल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही मुलं वेगवेगळ्या इमारतींमधील होती.

आपल्याला सणांचा हंगाम संपेपर्यंत थांबावं लागेल!

गेल्या २४ तासांच्या कालावधीत शहरातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ३३ वरून ५ हजार ३९३ वर गेली आहे. राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले की, प्रवासावरील निर्बंध हटवल्यानंतर एका आठवड्यात शहराचा करोना रुग्णसंख्येचा आलेख बदलू लागला. पहिल्या आठवड्यात प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली दिसत नसली तरी पुढील दोन आठवड्यांत करोना संख्येचा प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी वाढलं. असं लक्षात येत की दररोज सुमारे ३५० प्रकरणं समोर येत आहेत. यावेळी, डॉ. “राहुल पंडित यांनी असंही सांगितलं आहे की, करोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे की नाही हे नेमकं समजून घेण्यासाठी आपल्याला सणांचा हंगाम संपेपर्यंत थांबावं लागेल.”