राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. कारण, अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर सुरूच आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या कधी जास्त तरी कधी कमी आढळून येत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्वोतोपरी तयारी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ६ हजार ८५७ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ६ हजार १०५ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, आज राज्यात २८६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,६४,८५६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.५३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मतृयदूर २.१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७३,६९,७५७ प्रयोगशाळा नमन्यांपैकी ६२,८२,९१४ (१३.२६ टक्के) नमने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,८८,५३७ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर ३,३६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण ८२,५४५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत ४०४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३८२ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत आतापर्यंत ७ लाख ११ हजार ६९७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ५ हजार २८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा वेग १,३८३ दिवसांवर पोहोचला आहे. तर २१ जुलै ते २७ जुलै दरम्यान कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के इतकं होतं.