News Flash

परप्रांतीय गायींचा जळगावमधील चाऱ्यावर डल्ला

दुष्काळामुळे जिल्ह्यात यंदा पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या वैरणीची समस्या गंभीर झाली आहे.

जळगाव जिल्ह्य़ातील शेती शिवारात हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या गायी. (छाया- जितेंद्र पाटील)

जळगाव : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक पशु पालकांच्या जनावरांना पुरेशी वैरण उपलब्ध व्हावी, यासाठी चारा परजिल्ह्य़ात नेण्यासह चराईसाठी जंगल विक्रीला जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यानंतरही संपूर्ण जिल्ह्य़ात काठेवाडींचे हजारोंच्या संख्येने असणारे गायींचे कळप चराईसाठी फिरताना दिसत आहेत.

दुष्काळामुळे जिल्ह्यात यंदा पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या वैरणीची समस्या गंभीर झाली आहे. तुटवडय़ामुळे कडब्याचे दर कधी नव्हे, ते यंदा १० हजार रूपये प्रतिएकरपर्यंत पोहोचले आहेत. चारा टंचाईमुळे असंख्य शेतकऱ्यांनीदावणीला असलेली जनावरे विकण्यावर भर दिला आहे.

हिरव्या वैरणीची उपलब्धता घटल्याने दूध उत्पादनावरही विपरीत परिणाम झाला आहे. या परिस्थितीत चारा संवर्धनासाठी हातभार लावून स्थानिक पशुपालकांना दिलासा देण्याची गरज असताना, गावोगावच्या पीक संरक्षण संस्थांनी परप्रांतीय काठेवाडींना चराईसाठी जंगल विकण्याचा सपाटा लावला आहे. हजारोंच्या संख्येने गायी, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा घेऊन फिरणाऱ्या काठेवाडींकडून झालेल्या अतिक्रमणामुळे चराऊ जंगले क्षणार्धात फस्त होऊ  लागली आहेत. शेती शिवारात अद्याप रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, मका ही पिके उभी आहेत. तेवढय़ात काठेवाडींच्या गायींचे कळप जंगलात शिरल्याने शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल वाढली आहे. कारण, शेतकरी शेतात नसताना काठेवाडी उभ्या पिकांत त्यांची जनावरे चरण्यासाठी सोडण्यास अजिबात मागे पुढे पाहत नाहीत. पिकांच्या नुकसानीबद्दल तक्रार करण्यासाठी पीक संरक्षण संस्थांमध्ये गेल्यावर तिथे कोणीच दाद देत नाही. आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी उलट काठेवाडींना पाठिशी घातले जाते.

शेतकऱ्यांच्या  मालकीचे शेती शिवार काठेवाडींच्या गायींना चराईसाठी देण्यापूर्वी ग्रामसभेची परवानगी घेण्यासह दवंडीद्वारे तशी सूचना सर्वाना देणे पीक संरक्षण संस्थांसाठी बंधनकारक असते. प्रत्यक्षात सर्व नियम धाब्यावर बसवून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करून पीक संस्थांनी यंदाही परस्पर जंगल विकले आहेत. याबद्दल नाराजी व्यक्त करून यावर प्रतिबंध घालण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 12:01 am

Web Title: cow from outside eating fodder in jalgaon
Next Stories
1 विदर्भात गारपीट, वर्ध्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
2 नगरमध्ये आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार, सुजय विखेंबरोबर रंगणार लढत
3 अखेर राजीनामा बाहेर! शिवसेना आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी
Just Now!
X