कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न भाकपच्या कार्यकर्त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर सभागृहाबाहेरील रस्त्यावर कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. पोलिसांनी त्वरित त्यांना ताब्यात घेतले. याआधी माकप व समविचारी पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मोर्चा काढून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे वितरण शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या पाश्र्वभूमीवर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आंदोलनाची आधीच तयारी केली होती. भाकपच्या जिल्हा शाखेच्या बैठकीत पानसरे यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा जिल्हा सचिव राजू देसले यांनी दिला होता. या वेळी पुन्हा काही गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेने सकाळपासून भाकपच्या कार्यकर्त्यांची शोधाशोध सुरू केली होती. महाकवी कालिदास कलामंदिराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. सभागृहात ते गेल्यानंतर भाकपचे कार्यकर्ते कलामंदिरासमोरील रस्त्यावर अवतीर्ण झाले. काळे झेंडे दाखवत त्यांनी निषेध केला. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेत वाहनातून लगेचच त्यांनी रवानगी पोलीस ठाण्यात केली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर हा प्रकार न घडल्याने पोलिसांचा जीव भांडय़ात पडला.