|| रमेश पाटील

विक्रीवर पंचवीस ते तीस टक्के परिणाम; खरेदीदारांनी फिरवली पाठ : – कोकण, ठाणे, पालघर जिल्ह्य़ात फटाक्यांचे शहर अशी ओळख असलेल्या वाडा शहरातील किरकोळ फटाके विक्रेत्यांना मंदीचा फटका बसला आहे. विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यात पाऊस आणि प्रदूषणमुक्तीसाठी ‘फटाकेविना दिवाळी’ यामुळे खरेदीदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

कोकण, ठाणे यासह नाशिक जिल्ह्य़ातील फटाके विक्रेत्यांना वाडा शहरातून फटाके पुरविले जातात. वर्षभर येथे फटाक्यांचा व्यवसाय सुरू असतो. दिवाळीमध्ये मोठी उलाढाल होत असते. मात्र यावर्षी मंदीचे सावट आहे. त्यात पावसाचाही मोठा परिणाम या व्यवसायावर दिसत आहे.

पूर्वी फटाक्यांचा व्यवसाय हा दिवाळी सणापुरताच मर्यादित होता. मात्र आता हा व्यवसाय बारमाही झाला आहे. विविध सण, लग्न समारंभ, विविध राजकीय पक्षांच्या सभा, निवडणुका, विविध कार्यक्रम, वाढदिवसाला फटाक्यांची मागणी असते. वाडा शहरात घाऊक फटाक्यांची दुकाने असून ती दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत रात्रंदिवस सुरू असतात.

तामिळनाडू येथील शिवा काशी येथे फटाक्यांचे उत्पादन केले जाते. तेथून थेट माल वाडय़ातील व्यापारी आणतात. या व्यापाऱ्यांनी वाडा व विक्रमगड तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठमोठी गोदामे असून यात माल ठेवला जातो.

सध्या फॅन्सी फटाक्यांची क्रेझ असून ५० ते  २०० रुपयांपर्यंत किमती आहेत. यामध्ये शोभेचे फटाके, पाऊस, चक्री, फुलबाजे, रॉकेट, फॅन्सी शॉट, फॅन्सी मल्टीकलर शॉट, आकाशात उडणारे फॅन्सी शॉट, डबल बार, ट्रिपल बार, कार्टून, नागगोळी, चिटपुट, किटकॅट, अ‍ॅमबॉम्ब, लवंगी, आकाशातील रंगीबेरंगी फटाके, सुतळी बॉम्ब, जमीन चक्र, फटाकडी आदी फटाके येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यावर्षी फटाक्याचे दरसुद्धा १० ते १५ टक्क्य़ांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

शहरात वाहतूक कोंडी

फटाके हे ज्वलनशील असल्याने काही दुर्घटना घडू नये म्हणून प्रत्येक दुकानात फायर नियंत्रण यंत्र बसवण्यात आले आहे. तसेच दुकानासभोवताली पाण्याची वाहिनी फिरवण्यात आली आहे. तसेच दुकानासमोर वाहनतळाची व्यवस्था केली आहे. मात्र वाडा शहराकडे येणाऱ्या रस्त्यांची झालेली दुर्दशा, तसेच फटाक्याची सर्व दुकाने शहरापासून एक किलोमीटर लाब अंतरावर असल्याने या दुकानांकडे जाणारा रस्ता वाडा शहरातून जातो, हा रस्ता अरुंद असल्याने वाडय़ात सध्या रोजच वाहतूक कोंडी होत आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी फटाक्याच्या विक्रीत खूपच घट झाली आहे. अर्थिक मंदीमुळेच ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. -नंदकुमार आंबवणे; नंदकुमार ट्रेडर्स, वाडा

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर आलेले संकट व महिनाअखेरीस आलेली दिवाळी यामुळे फटाके विक्रीवर परिणाम झाला आहे. –श्रीकांत भोईर, किरकोळ फटाके विक्रेते, वाडा