वादग्रस्त संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या थकीत कर्जाच्या वसुलीस अवसायक मंडळाने मंगळवारी सुरुवात केली. या मोहिमेचा शुभारंभ करताना राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा अवसायक मंडळाचे सदस्य काका कोयटे हेही त्यात जातीने सहभागी झाले. शहरातील बरेचसे ठेवीदारही या वेळी उपस्थित होते.
संपदा पतसंस्था दिवाळखोरीत निघाल्यानंतर संस्थेतील तब्बल ३२ कोटी रुपयांच्या ठेवींचे भवितव्य अधांतरी असून त्यामुळे ठेवीदार कमालीचे अस्वस्थ आहेत. संस्थेने १२ कोटी रुपयांचे तारण कर्ज व ९ कोटी रुपयांचे सोनेतारण कर्ज वितरित केले आहे. त्यातील बहुसंख्य कर्जदारांनी ते फेडलेच नाही. संस्थेवर आता कोयटे यांच्या नेतृत्वाखाली अवसायक मंडळ नेमण्यात आले असून या मंडळाने गेल्या दि. ११ एप्रिलला सूत्रे स्वीकारली, त्यानंतर थकीत कर्जाच्या वसुलीला वेग आहे. कोयटे यांच्यासह वसंत लोढा, तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश वाबळे, सुरेश म्हस्के यांच्यासह सात जणांचा या मंडळात समावेश आहे.
अवसायक मंडळाने मंगळवारी विशेष वसुली अधिकाऱ्यांसह थकीत कर्जाच्या वसुलीला प्रारंभ केला. अवसायक मंडळाने सूत्रे स्वीकारल्यानंतर गेल्या सुमारे महिनाभरात ५ लाख रुपयांच्या कर्जाची वसुली झाली असून तीस कर्जदारांनी अवसायक मंडळाशी संपर्क साधून त्यांचे कर्ज अदा करण्याची तयारी दर्शवल्याचे कोयटे यांनी सांगितले. मात्र अन्य कर्जदारांकडील पैशासाठी आता मोहीमच उघडण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. त्याची सुरुवात मंगळवारी करण्यात आली. पारनेर व श्रीगोंदे तालुक्यांतील कर्जदारांनी स्वत:हून कर्ज भरण्याची तयारी दर्शवताना सामूहिकरीत्याच हे कर्ज ते फेडणार आहेत अशी माहिती कोयटे यांनी दिली.
कोयटे म्हणाले, या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्जदारांना समक्ष भेटून त्यांचे थकीत कर्ज फेडण्याची विनंती करण्यात येणार आहे. त्यासाठी काही दिवसांची मुदतही देण्यात येईल. परंतु जे कर्जदार या मोहिमेला प्रतिसाद देणार नाहीत किंवा कर्ज भरण्यात टाळाटाळ करतील त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेच्या जप्तीची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. येत्या दिवाळीपर्यंत ठेवीदारांची निदान तीस टक्के रक्कम तरी देता येईल या पद्धतीने ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचा दिलासा कोयटे यांनी दिला.
दरम्यान, या मोहिमेत अवसायक मंडळासह काही ठेवीदारही सहभागी झाले असून, महिला ठेवीदारांनी कर्जदारांच्या घरी गेल्यानंतर येते आक्रोश करीत कर्ज भरण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्याकडे संस्थेचे ४२ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी संस्थेकडून टाटा सफारी मोटार घेतली होती. अवसायक मंडळाने मंगळवारी त्यांची भेट घेऊन त्यांना कर्ज भरण्याची विनंती केली. मात्र आपण त्या वेळी ७ लाखांचेच कर्ज घेतले होते, शिवाय नंतर संस्थेने मोटार ताब्यात घेतली, आताही ही मोटार संस्थेच्या ताब्यात आहे असे त्यांनी सांगितले. या मोटारीचा लिलाव करून राहिलेली रक्कम भरण्याबाबतची तयारी त्यांनी दर्शवल्याची माहिती अवसायक मंडळाने दिली.