महाराष्ट्रात सध्या करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. संपूर्ण देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. तर महाराष्ट्र प्रशासन दुसऱ्या लाटेसोबत तिसऱ्या लाटेचाही विचार करुन तयारी करत आहे. त्याबरोबर लवकरच लहान मुलांसाठी वेगळे वॉर्ड तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.

मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की ते सध्या करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या नियोजनासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि तिसऱ्या लाटेशी लढा देण्याची तयारी करत आहेत.


मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्याशी चर्चा केल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी सांगितलं, तिसरी लाट आणि त्याच्यामुळे परिणाम होणाऱ्या रुग्णांचा विचार करता मी त्यांना लहान मुलांसाठी स्वतंत्र करोना वॉर्ड उभारण्याविषयी सुचवलं आहे. यासोबतच ज्या मुलांच्या पालकांना करोनाचा संसर्ग झाला आहे आणि मुलांना सांभाळण्याची व्यवस्था नसेल अशा करोनाची लागण न झालेल्या मुलांसाठी पाळणाघरांची सोय करण्याचंही सुचवलं आहे.

त्यांनी पुढे सांगितलं की, राज्य सरकारसोबतच स्थानिक प्रशासनही करोनाशी लढण्यासाठीची क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
ते म्हणतात, गेल्या वर्षापासूनच आपल्या जम्बो केअर सेंटर्समध्ये कोविड पॉझिटिव्ह डायलिसिस तसंच गर्भवती मातांची काळजी घेणारे विभागही आहेत. ज्याप्रमाणे विषाणू आपलं स्वरुप बदलून वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांवर परिणाम करत आहे, तशाच पद्धतीने आता आपल्यालाही सतर्क राहून त्या विषाणूप्रमाणे बदलावं लागेल.

त्याचबरोबर ते असंही म्हणाले की, आम्ही आता ६५०० ऑक्सिजन बेड्स आणि साधारणपणे १५०० आयसीयू बेड्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. पुढच्या काही दिवसांत नव्या जम्बो केअर सेंटर्समध्ये हे बेड्स उपलब्ध होतील.