आमची जनआशीर्वाद यात्रा ही राजकीय नसून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे. बेरोजगारीमुक्त, दुष्काळ मुक्त, सुरक्षित व सुदृढ असा स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा असल्याने तुमचे प्रेम व आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. माझ्याबरोबर तुम्ही असाल तर असा महाराष्ट्र घडविण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही, असा विश्वास शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेंगुल्रे येथे व्यक्त केला.

वेंगुल्रे सुंदर भाटले शिवसेना शाखेच्या समोर आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले.

या वेळी त्यांच्यासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडीप्रमुख जानव्ही सावंत, विक्रांत सावंत, वेंगुल्रे तालुकाप्रमुख यशवंत परब, सभापती सुनील मोरजकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

जनआशीर्वाद यात्रेसाठी निघालेल्या बसमधून स्वागत सभेच्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. प्रारंभी खासदार विनायक राऊत यांनी प्रास्ताविक केल्यावर आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

कुडाळ, कणकवली या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांनी मार्गदर्शन केले.