सांगोला नगरपालिकेच्या अवघ्या पाच महिन्यांत दोन नगराध्यक्षांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यामुळे येथील सत्ताधारी शेकापसह काँग्रेस व राष्ट्रवादीची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. विशेषत: गेली पन्नास वर्षे विधानसभेवर सांगोल्यातून प्रतिनिधित्व करणारे शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांच्याही प्रतिमेला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
सांगोला नगरपालिकेत अनेक वर्षांपासून शेकापचे वर्चस्व आहे. अलीकडे शेकापबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेत आघाडी झाली आहे. त्यामुळे नगरपालिकेत विरोधकांचे अस्तित्वच नगण्य ठरले आहे. तरीदेखील ॠषितुल्य व निष्कलंक समजले जाणारे आमदार गणपतराव देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे व काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले माजी आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांचे नगरपालिकेच्या कारभारावर लक्ष असते. या ज्येष्ठांचे लक्ष असूनसुध्दा नगरपालिकेत नगराध्यक्षांचा मनमानी कारभार चालावा व त्यातून लाचलुचपतीच्या घटना उघडकीस याव्यात, ही बाब नगरपालिकेच्या तसेच ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिष्ठेला सुरूंग लावणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सांगोला परिसर पारंपारिक दुष्काळी असल्याने येथे नेहमीच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो.  त्यासाठी नगरपालिकेमार्फत ठेका दिला जातो. एका ठेकेदाराने टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्याबद्दल नगरपालिकेत ३७ हजार ३५० रुपयांचे देयक सादर केले असता हे देयक मुद्दाम अडवून ठेवून लाच मागण्याचे कृत्य नगराध्यक्ष सुहास ऊर्फ चंदन व्होनराव यांनी केले. व्होनराव हे काँग्रेसचे असून त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती श्रीमंतीची आहे. तरीसुध्दा सत्तेवर बसल्यानंतर त्याचा दुरूपयोग करीत लाचखोरीची हाव सुटली नाही. पाच महिन्यांपूर्वी शेकापचे नवनाथ पवार हे नगराध्यक्षपदावर कार्यरत असताना त्यांनी सांगोला शहर विकास आराखडय़ाच्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी एका मक्तेदाराकडून ६० हजारांची लाच घेतली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार गणपतराव देशमुख यांनी पवार यांची चांगलीच हजेरी घेऊन त्यांना पदमुक्त केले होते. त्यांच्या पश्चात काँग्रेसचे चंदन व्होनराव यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली असता त्यांनीसुध्दा पूर्वीच्याच नगराध्यक्षांचा कित्ता गिरवत लाचखोरीची प्रवृत्ती जोपासल्याचे दिसून आले.
अवघ्या पाच महिन्यात दोन नगराध्यक्ष लाच घेताना सापडल्याने आमदार गणपतराव देशमुख यांना त्याची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे. लागोपाठ दोनवेळा नगराध्यक्ष लाच घेताना सापडल्यामुळे या नगरपालिकेतील कारभार कसा असेल, याचा विचार करून संबंधित सत्ताधा-यांच्या सदस्यत्वाचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी पुढे येत आहे.