मोटारीसह २५ लाखांच्या रोख रकमेच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सातारच्या एका वकिलासह त्यांचा आई-वडील व बहिणीविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अकलूजलगतच्या माळीनगर गट नं. २ येथील विजय भोंगळे यांची मुलगी अमृताचा विवाह साता-याचे प्रशांत सपकाळ यांच्याशी सुमारे १२ वर्षांपूर्वी झाला. त्या वेळीही भोंगळे यांनी ६ ते ७ लाख रुपये खर्च केला होता. लग्नानंतर अमृतास प्रथम मुलगी झाल्याने तिला घरातून मानसिक त्रास सुरू होऊन ‘मुलीचा संपूर्ण खर्च व लग्नासाठी आताच ५ लाख रुपये घेऊन ये’ अशी मागणी सुरू झाली. सर्व त्रास सहन करून निराशपणे अमृता जीवन जगत असताना तिला वेडी ठरविण्यासाठी जबरदस्तीने ‘शॉक ट्रीटमेंट’ व विनाकारण चुकीची औषधे देण्यात आली. पुढे अमृताच्या आईच्या मृत्यूनंतर तिचे २२ तोळे सोन्याचे दागिनेही जबरदस्तीने नेले. यानंतरही मोटार व २५ लाख रुपये घेऊन ये म्हणून तिला जबरदस्त मारहाण होऊ लागली व शेवटी मुलीस ठेवून घेऊन तिला घरातून हाकलून लावले. त्यानंतरही माळीनगरला येऊन त्याच मागणीसाठी अर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्या वेळी तक्रार करूनही अकलूज पोलिसांनी दखल न घेतल्याने अमृता व तिचे वडिलांनी माळशिरस न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असता न्यायालयाने या प्रकरणी तपास करण्याचे अकलूज पोलिसांना आदेश दिले. त्यावरून पोलिसांनी चौकशी अंती कारवाई करून चौघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.