तालुक्यातील खोरदड येथील महिलेच्या विनयभंग प्रकरणातील संशयितांना जामीन मिळवून दिल्याने बंजारा समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबावर बहिष्कार घालत वाळीत टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. थेट गृहमंत्र्यांकेड ट्विटरव्दारे यासंदर्भात तक्रार करण्यात आल्यावर धुळे तालुका पोलीस ठाण्यात २० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी खोरदड येथील दीपक राठोड (३५) याने तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीनुसार गावातील मोहन चव्हाण, जगदीश राठोड, इंदल राठोड, विजय जाधव यांच्यासह २० जणांनी संगनमत करुन दीपक आणि त्यांच्या कुटुंबियांना गावातून बहिष्कृत केले. त्यांच्याशी संबंध आणि संपर्क टाळला. वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करत ठार मारण्याची धमकी देण्यात आली. सप्टेंबर महिन्यापासून हा प्रकार सुरू होता, असे तक्रारीत नमूद आहे. जात पंचायतीचा त्रास आणि मिळणारी अपमानास्पद वागणूक याविषयी ट्विटरवर तक्रारदाराने व्यथा मांडली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाकडून त्याची दखल घेण्यात आली. प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.

खोरदड गावात जाऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी तक्रारदारांसोबत अंधश्रध्दा निर्मूलन समितीने प्रशासनाकडे तक्रार अर्ज देऊन व्यथा मांडली होती.