रुग्णालयातील परिचारिकांसोबत असभ्य वर्तणूक करून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्य्कीय अधिकारी याच्यावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून परिचरिकांशी असभ्य वर्तन आणि लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारी  दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला.

गेली चार वर्षे हा आरोग्य अधिकारी वाडा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहे. वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील शासकीय वसाहतीत तो राहत होता. गेले अनेक महिने तो रुग्णालयाच्या परिचारिकांशी असभ्य वर्तन करीत होता. वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात तक्रार करण्यास परिचारिका धजावत नव्हत्या.  काही दिवसांपूर्वी या अधिकाऱ्याने मद्यपान करून  परिचारिकांशी असभ्य वर्तन केले.  त्यानंतर भ्रमणध्वनीवरून अश्लील व अर्वाच्च भाषेत संभाषण केल्याचे चौकशीत उघड झाले. अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळलेल्या परिचारिकांनी  पोलिसांसह जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व इतर ठिकाणी या तक्रारी दिल्या. या प्रकरणाची चौकशी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समितीमार्फत सुरू आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांचे एक पथक वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हा प्रकार धक्कादायक आहे. संबंधित डॉक्टरची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि विशाखा समिती पुढील तपास करीत आहे.

-डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर