News Flash

पंढरपुरात एका परदेशी साधकासह ‘इस्कॉन’च्या चौघांविरोधात गुन्हा

हे सर्व जण मास्क न लावता फिरत होते

संग्रहित छायाचित्र

संसर्गजन्य रोगाबाबत निष्काळजीपणा दाखवत पंढरपुरात दाखल झालेल्या एका परदेशी साधकासह ‘इस्कॉन’च्या चौघांविरोधात पंढरपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात जोसेफ डायस (रा. बेळगाव, कर्नाटक), अमित रवींद्र पवणीकर (रा. नंदनवन, नागपूर), एरिक कॉ अजारनूर (रा. न्यूयॉर्क, अमेरिका) आणि लोकनाथ स्वामी (रा.आरवडे, जि. सांगली) अशी या साधकांची नावे आहेत. हे चार जण पुणे जिल्ह्यतील थेऊर येथून अत्यावश्यक समान घेऊन पंढरपूर येथे आले होते. मात्र हे सर्व जण मास्क न लावता फिरत होते. तसेच संसर्गजन्य रोगाबाबत त्यांच्याकडून अन्य प्रकारचाही निष्काळजीपणा केला गेला. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी या चार साधकांविरोधात गावकामगार तलाठी याने दिलेल्या तक्रारीवरून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे.

या बाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, पंढरपूर येथील इस्कॉन मंदिरात मंगळवारी एका परदेशी साधकासह ‘इस्कॉन’च्या चौघे आले होते. चार साधक पुणे जिल्ह्यतील थेऊर येथून आले. यात एक अमेरिकन साधक आहे. संध्याकाळी हे चार साधक इस्कॉन मंदिरात फिरताना नागरिकांना दिसून आले. या नागरिकांनी प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर गावकामगार तलाठी यांनी मंदिरातील मोहन रुपदा महाराज यांच्याकडे चौकशी केली असता परदेशी साधक त्यांच्या सोबत लोकनाथ स्वामी महाराज आणि अन्य दोघे जण पुणे जिल्ह्यतील थेऊर येथून पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरात आल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना बोलवून त्यांच्या पासबाबत चौकशी केली असता त्यांच्या पासवर ‘अत्यावश्यक सेवा’ असे लिहिले होते. त्यांना सोडण्यासाठी आलेल्या वाहनासाठीही १३ ते १५ एप्रिल दरम्यानसाठी हा पास देण्यात आला होता. या चार साधकांना पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरात सोडून सदर गाडी परत गेली.  या चारही साधकांची उप जिल्हा रुग्णालयात तपासणी केली असून त्यांच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’चे शिक्के मारले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:50 am

Web Title: crime against four of iskcon with a foreign seeker in pandharpur abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 एका डोळ्यात हसू अन् दुसऱ्यात आसू
2 टाळेबंदीतही चोरटे सक्रिय
3 धुळ्यात आठ हजार जणांची तपासणी
Just Now!
X