टाळेबंदी असतांनाही मध्यरात्री गर्दी करुन बसलेल्या तरुणांना घरी जाण्यास सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केल्याप्रकरणी शहराचे आमदार फारुक शाह  यांचा मुलगा आणि इतर १० ते १२ जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हवालदार दीपक पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार करोनाचा फैलाव रोखण्यासाठी धुळे शहरासह जिल्ह्यात टाळेबंदी कडक करण्यात आली आहे. जमावबंदी आदेश लागू आहे. बुधवारी मध्यरात्री आझादनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी गस्तीसाठी वडजाई रोड भागात गेले असता त्यांना भोलाबाजार चौकात तरुणांचे टोळके उभे असलेले दिसले. त्यामुळे हवालदार पाटील आणि रमेश गुरव यांनी टोळक्यास गर्दी करु नका, घरी जा, असे सांगितले.

टोळक्यात असलेला आमदार फारुक शहा यांचा मुलगा शाहबाज आणि त्याचा मित्र शाहरुख यांनी उलट पोलिसांनाच तुम्ही दारुच्या नशेत आहात आणि आम्हांला शिवीगाळ करतात, असे म्हणत एका तरुणाला भ्रमणध्वनीत चित्रीकरण करण्यास सांगून शिवीगाळ केली. याप्रकरणी शाहबाज शाह, शाहरुख आणि इतर १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मृत करोना संशयिताच्या तपासणी अहवालाची प्रतिक्षा

धुळ्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका वृद्धेसह मच्छिबाजार परिसरातील एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला. महिला रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होती. तर मच्छिबाजार परिसरातील व्यक्ती उपचारासाठी अपघात विभागात दाखल झाल्यानंतर मृत झाला. हिरे महाविद्यालय प्रशासनाने त्या दोघा मृत रुग्णांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

प्रशासनास या तपासणी अहवालांची प्रतिक्षा असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी दिली. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात एक वृद्ध महिला उपचारासाठी दाखल झाली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. मच्छिबाजार परिसरातील एका व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला बुधवारी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या व्यक्तीचा न्युमोनियाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. असे असले तरीही खबरदारी म्हणून डॉक्टरांनी त्या दोघा मृत रुग्णांचे घसा आणि नाकातील द्रवांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. गुरुवारी रात्रीपर्यंत दोघा रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल येईल, अशी अपेक्षा डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

हिरे महाविद्यालयात बुधवार सकाळपासून तर गुरुवारी सकाळी आठपर्यंत ९९ रुग्णांची तपासणी झाली. ८१ रुग्णांना कुठलेही लक्षण आढळली नाहीत. संशयित १८ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यासह २० रुग्णांचे अहवाल हे नकारात्मक आले आहेत. गुरुवारी दुपारुन १६ रुग्णांचे नमुने घेण्यात आले असून त्यांचा अहवालही गुरुवारी रात्रीपर्यंत येईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.