महसूल विभागातील पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचे मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने केल्याप्रकरणी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाविरुद्ध (एमकेसीएल) सांगलीच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या मूल्यांकनात उत्तरे आणि प्राप्त गुण यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल विभागातील लिपिक, टंकलेखक व तलाठी पदाच्या रिक्त जागांसाठी महसूल विभागाने उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन त्याचे मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाशी करार करण्यात आला होता. या महामंडळामार्फत शासनाबरोबरच महत्त्वाच्या कंपन्यांसाठी कर्मचारी भरती प्रक्रिया पार पाडली जाते. २७ फेब्रुवारी २०१४ रोजी सांगलीतील रिक्त पदांसाठी महामंडळाने परीक्षा घेतली होती.
लेखी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका स्कॅनिंग करून मूल्यांकन जाहीर करण्याची जबाबदारी एमकेसीएलची होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तरविवरणी व प्रसिद्ध करण्यात आलेले गुण याबाबत परीक्षार्थीनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकेच्या कार्बन कॉपीवरून यामध्ये तफावत आढळून आली. प्रत्यक्ष बरोबर उत्तरे आणि प्राप्त गुण यांचा मेळ लागत नसल्याचे उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता एमकेसीएलकडून चुकीच्या पद्धतीने गुणांची यादी तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कंपनीचे महाव्यवस्थापक मोहन ठोंबरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.