कोतवाली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नितीन साठे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे चौकशी सोपवण्यात आली आहे, त्यांच्या अहवालात दोषी आढळल्यास संबंधित पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर ते बोलत होते. दलित अत्याचारांच्या घटनांसंदर्भात असंवेदनशीलता दाखवली जात असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. मात्र शिर्डीतील सागर शेजवळ या खून झालेल्या युवकाच्या कुटुंबाची आपण भेट घ्यायला हवी होती, अशी कबुलीही त्यांनी दिली.
रिपब्लिकन पक्षाचे नेते खा. रामदास आठवले उद्या, शनिवारी नगरला येत आहेत. या पाश्र्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी अशोक गायकवाड यांच्या मोबाइलवरून आठवले यांच्याशी शिंदे यांनी संपर्क साधला. मृत्यूसंदर्भात पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे, अधिक चौकशी सीआयडी तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे सोपवण्यात आल्याची माहिती त्यांनी आठवले यांना दिली.
नितीन साठे याच्या मृत्यूची ‘कस्टोडिअल डेथ’ प्रमाणेच चौकशी केली जाईल. चौकशी निष्पक्ष व्हावी, यासाठी सीआयडीकडे देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. जिल्हा दलित अत्याचारग्रस्त म्हणून जाहीर करा, अशी मागणी होत असतानाच पोलीस यंत्रणेच्या ताब्यातील दलित युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने या मागणीला दुजोरा मिळतो आहे का, यावर शिंदे यांनी, या प्रश्नाला वाव नाही, असे उत्तर दिले.