छत्रपती शिवरायांचे वारसदार खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दाखल केलेल्या तक्रारीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

अ‍ॅड. आंबेडकर यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत छत्रपतींचे वारस असलेल्या राजांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले. गुरुवारी सातारा, सांगली, कोल्हापूर येथे आंबेडकर यांचा निषेध करत अनेक कार्यकर्ते रस्त्यावर आले होते. शुक्रवारी साताऱ्यात पुन्हा आंदोलन होत अ‍ॅड. आंबेडकर यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर मोर्चाचे भागवत कदम यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अ‍ॅड. आंबेडकर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.