गणेश प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत ‘डीजे’चा दणदणाट करणा-या शहरातील तीन बडय़ा तरुण मंडळांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. कोतवाली पोलिस ठाण्यात एका तर तोफखाना पोलिस ठाण्यात दोघा मंडळांच्या पदाधिका-यांसह डीजे व वाहनचालक अशा एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करतानाच वाहनासह डीजेचे साहित्य, जनरेटरही जप्त करण्यात आले आहे. त्यातील चौघांना अटक केल्यानंतर आज, शनिवारी न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.
गणेश प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट टाळण्यासाठी माळीवाडा भागातील मानाच्या ११ मंडळांनी, डीजेला मनाई करण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला, त्याचे अनुकरण शहरातील इतर मंडळांनीही केले. मात्र तरीही पोलिसांनी पूर्वसूचना देऊनही व नागरिकांना त्रास होत असूनही काही मंडळांनी जाणीवपूर्वक हा दणदणाट केलाच. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायदा ३६ चे कलम १३४, ३३ (६), १३१, वाहन कायदा ७७ तसेच भादंवि २६८, २९०, २९१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील सिद्धेश्वर तरुण मंडळाचे (जंगूभाई तालीम ट्रस्ट) अध्यक्ष राजूमामा दत्तात्रेय जाधव व डीजेचालक सागर विजय कांबळे (पुणे) या दोघांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डीजेचे साहित्यही जप्त करण्यात आले. सागर कांबळे याला अटक करण्यात आली. आज न्यायालयाने त्याची दहा हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. तोफखाना पोलिसांनी मिसाळ गल्लीतील गणेश बाल मंडळाचे सचिन राजेंद्र आलचेट्टी (तोफखाना) याच्यासह शब्बीर शेख, दिलीप बनसोडे, जावेद अली शेख (तिघेही रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत साहित्य जप्त केले. यातील शब्बीर व बनसोडे या दोघांना अटक करण्यात आली. नंतर दोघांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. दोन्ही गुन्ह्य़ांसंदर्भात पोलिस शिपाई राजेंद्र गर्गे यांनी फिर्याद दिली आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याचे कर्मचारी विकास खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हलवाई गल्ली तरुण मंडळाचे अध्यक्ष तेजस सतीश गुंदेचा व अभिनव प्रकाश सूर्यवंशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांची नंतर न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. कारवाईपूर्वी कोतवाली पोलिसांनी पुण्यातील अनेक डीजे चालकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे अनेकांनी नगरमधील मंडळांच्या सुपा-या घेणे टाळले.