दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मंगळवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.
जमावबंदी आदेश धुडकावून आंदोलन केल्याप्रकरणी आता या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांतील रस्त्यांची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करूनही संबंधित विभागांनी याकडे लक्ष दिलेले नाही. शासन आणि दिघी पोर्टमध्ये झालेल्या करारानुसार बंदराला जोडणाऱ्या रस्त्याची देखभाल, दुरुस्ती आणि रुंदीकरण हे दिघी पोर्टने करणे अपेक्षित आहे. मात्र रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण न करताच बंदर प्रशासनाने या रस्त्यांवरून वाहतूक सुरू केली आहे. या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असून त्याची देखभाल-दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनाबाबतची माहिती मिळाल्यानंतर दिघी सागरी पोलिसांनी पक्ष कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती.
जिल्ह्य़ात जमावबंदी लागू असल्याने, योग्य त्या कार्यालयातून आंदोलनाची परवानगी घ्यावी, असेही सूचित करण्यात आले होते. मात्र पोलिसांच्या नोटिसीची पक्षाकडून दखल घेण्यात आली नाही.
आणि हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या वेळी १०० ते १२५ लोकांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे जमावबंदी आदेश धुडकावल्याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात १६ जणांविरोधात मुंबई पोलीस अ‍ॅक्ट कलम ३७(१), (३)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस-तपास सुरू आहे.