सोलापूर : ज्ञाती संस्थेच्या त्रवार्षिक निवडणुकीस उपाध्यक्षपदासाठी उभा राहिल्याचा तसेच नवरात्रौत्सवात जमा-खर्चाचा हिशेब मागितल्याचा राग मनात धरून ज्ञाती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकारिणी सदस्यांनी ठरावाद्वारे एका कुटुंबीयांसह निकटच्या नातेवाइकांना समाजातून बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला. हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर संबंधितांविरूध्द सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्याखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोलापुरात पूर्व भागातील हिंदू तोगटवीर क्षत्रिय समाजाशी संबंधित हे प्रकरण आहे. यासंदर्भात पीडित व्यंकटेश रामदास रंगम (वय ५८, रा. जोडभावी पेठ, सोलापूर) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीनुसार तोगटवीर ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र शेषप्पा पुडूर व सचिव तथा मानकरी श्रीनिवास दत्तात्रेय गट्टी यांच्याविरूद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्याखाली जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. असा गुन्हा नोंद होण्याचा सोलापूर शहरातील हा पहिलाच प्रसंग असल्याचे म्हटले जाते.

पीडित व्यंकटेश रंगम हे उच्च विद्याविभूषित कुटुंबातील आहेत. त्यांची मुलगी युरोपात पोलंडमध्ये पीएचडी करीत आहे, तर मुलगा मुंबईत जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. रंगम हे स्वत: दयानंद शिक्षण संस्थेच्या एका प्रशालेतील सेवानिवृत्त ग्रंथपाल आहेत. रंगम कुटुंबीय हिंदू तोगटवीर क्षत्रिय समाजाचे आहेत. सोलापुरात या समाजाची लोकसंख्या सुमारे १५ हजारांएवढी आहे. तेलुगू भाषिक असलेल्या या समाजाचा पारंपरिक विणकर व्यवसाय असला तरी अलीकडे अन्य व्यवसायाकडेही हा समाज वळला आहे. या समाजाचे शहरात आठ समूह गट (गट्टी फंड) आहेत. यापैकी सोमवार पेठ गट्टी फंड हिंदू तोगटवीर क्षत्रिय सेवा संघमचे रंगम हे आजीव सभासद आहेत. आठ गट्टी फंडांतून एकूण पाच पदाधिकारी त्रवार्षिक निवडले जातात. २०१८ ते २०२१ या तीन वर्षांसाठी २४ जून २०१८ रोजी पदाधिकारी निवडीची प्रक्रिया होणार होती. त्या वेळी रंगम यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली असता निवडणुकीत हात वर करून निवडणूक प्रक्रिया होत असल्यामुळे त्यास रंगम यांनी हरकत घेत स्वत:ची उमेदवारी मागे घेतली होती. त्यानंतर सोमवार पेठ गट्टी फंडाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतरांनी आपणांस उपाध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याच्या कारणावरून, रागापोटी व्यंकटेश रंगम यांना सोमवार पेठ गट्टी फंडातून काढून टाकण्याचा ठराव मंजूर झाला. याशिवाय नवरात्रौत्सवात झालेल्या जमा-खर्चाचा हिशेब मागितल्याचाही राग होता. त्यातूनच रंगम यांच्यासह त्यांचे जवळचे नातेवाईक मृत गोविंद नारायण चारगुंडी, गंगाधर नारायण चारगुंडी, चंद्रकांत नारायण चारगुंडी यांनाही गट्टी फंडातून काढून टाकण्यात आले आहे. तेव्हापासून समाजातील लोक रंगम व चारगुंडी कुटुंबीयांना कोणत्याही कार्यक्रमात बोलावत नाहीत.