प्रेमभंग झाल्याच्या नैराश्येतून रेडी येथील प्रेयसी व आजीच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी लव नाईक (३१) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

प्रेमभंग झाल्याच्या नैराश्येतून साडेसहा वर्षांपूर्वी वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथे कु. श्रद्धा सखाराम परब (२२) व तिची आजी श्रीमती सुभद्रा राणे (६५) यांची हत्या करण्यात आली होती.

या खटल्याचा निकाल देताना न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी आरोपी लव नाईक याला  कलम ३०२ अन्वये दोषी ठरविले. जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी सहा महिने सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली.

सावंतवाडीत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कु. श्रद्धा सखाराम परब हिच्या प्रेमात पडलेला आरोपी लव नाईक याने शिक्षण पूर्ण झाल्यावर श्रद्धा दुसऱ्या युवकाच्या प्रेमात पडल्याच्या संशयावरून डोक्यात तणाव केला. आपला प्रेमभंग झाल्याच्या नैराश्येने तिच्या घरी रात्रीच्या वेळी लव नाईक पोहचला आणि त्याने १९ जून २०१० रोजी श्रद्धाच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर कु. श्रद्धा व तिच्या आजीला ठार मारले. या दरम्यान त्यांच्यात भांडणही झाले होते. या प्रकरणी सिंधुदुर्ग सीआयडी ब्रँचने तपास केला होता. या दरम्यान आरोपी लव नाईक याच्या आईचा दुर्दैवी अंत झाला होता. तसेच आरोपी अडीच वर्षे फरार झाला होता. त्यानंतर गेली चार वर्षे तो तुरुंगात आहे. आता जन्मठेप झाल्याने आयुष्यभर तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

रेडी येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपीने अडीच वर्षे पोलिसांना नाचविले होते. सिंधुदुर्ग सीआयडी ब्रँँचने त्याला २८ नोव्हेंबर २०१२ रोजी बंगलोर येथे अटक केली होती. न्यायालयात जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. सूर्यकांत प्रभुखानोलकर यांनी सरकारची बाजू यशस्वीपणे सांभाळली.

या प्रकरणातील आरोपी लव नाईक याने थंड डोक्याने खून करून पोलिसांना गुंगारा दिला. त्यामुळे पोलिसांना पुरावा हस्तगत करण्यासाठी तपासादरम्यान अडथळा आला, पण पोलिसांनी यशस्वीपणे तपास केला. आरोपीचा शोधदेखील घेताना माध्यमांचा वापरही करावा लागला होता.

कारचोराला सावंतवाडी पोलिसांकडून अटक

सावंतवाडी : हरियाणातून गोवा राज्यात वाहतूक करणाऱ्या कंटेनरमधील स्विप्ट कार आंबोली येथे उतरवून ती चोरीच्या उद्देशाने कर्नाटक चित्रदुर्गपर्यंत नेणारा कंटेनर चालक अकील हाज्रु(२२) याला सावंतवाडी पोलिसांनी चित्रदुर्ग मथराईमध्ये कारसह अटक केली. दरम्यान कंटेनरमधील दुसरी कार टोचण लावून नेणाऱ्या गडहिंग्लजमधील अन्य दोघा संशयीताना पोलीस रविवारी अटक करणार आहेत.

पोलीस अधिक्षक समोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी उपनिरीक्षक जयदीप कळेकर, हवालदार संजय दुबे, प्रमोद काटसेकर या पथकाकडे तपासाची जबाबदारी दिली होती. या पथकाने मोबाईलच्या कॉलच्या आधारे शोध घेत कर्नाटक चित्रदुर्ग मथुराई येथून आरोपी अकील हाज्रु रा. हरियाणा याला अटक केली. त्यानंतर नवी कोरी स्विप्ट कारही जप्त केली. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे असे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले. कंटेनर चालकाने चोरीच्याच इराद्याने स्विप्ट कार चोरून नेली होती. या नव्या कोऱ्या गाडीचे कागदपत्र नसल्याने तो गाडीचे पार्ट विकण्याच्या तयारीत होता असा संशय पाटील यांनी व्यक्त केला आहे. चेतक लॉजीस्टीक कंपनीचे मॅनेजर जय भगवान दिलीप सिंग यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. चेतक लॉजीस्टीक कंपनीच्या सुझीकी ट्रान्सपोर्ट हरियाणा वरून गोवा राज्य येथे  एचआर ५५ ए ७६१६ या कंटेनर मधून पाच मारूती व्हीएक्सआय स्विप्ट कार आणल्या जात होत्या. पंपावर पोहचल्यावर टेपणी देतो त्या बदल्यात पेट्रोल घालण्याची मागणी केली, पण पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी मॅनेजरला फोन लावून देण्यास सांगितले.

या स्विप्ट कारमध्ये पेट्रोल घालून कंटेनर चालक अकील हाज्रु हा कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे पोहचला, तेथे पेट्रोल संपले म्हणून गाडीची टेपणी विकली.

कर्नाटक चित्रदुर्ग येथील पोलीस इन्स्पेक्टर एस. सतीश यांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक जयदीप कळेकर, हवालदार संजय हुंबे, प्रमोद काळसेकर यांनी शोध घेतला. तेथे कंपनीचे मॅनेजर धनसिंग कासवान पोहचले. त्यानंतर चित्रदुर्ग बेलाटी हॉस्पेट मथुराई येथे कंटनेर चालक मिळाला. त्यानंतर होशीयाळी पोलीस ठाण्याजवळील चौधरी धाबा येथे स्विप्ट कार आढळून आली. कंटेनर चालक अकील हाज्रु (२२) याने चोरीच्या इराद्याने स्विप्ट कार पळविली, पण पेट्रोल नसल्याने तो अडचणीत सापडला.

कार गाडी विकणार तर त्याच्याकडे गाडीचे कागदपत्र नव्हते. या नवीन कोऱ्या गाडीचे स्पार्ट विकण्याचा त्याने प्रयत्न चालविला होता. पेट्रोलसाठी टेपणीदेखील त्याने विकली होती, असे पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले. त्याचे वडीलदेखील हरियाणात ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला आहेत.

या आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची सोमवापर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.